‘गोकुळ’च्या शिरोळ सॅटेलाईट डेअरीचे काम प्रगतिपथावर
By Admin | Updated: November 14, 2014 00:44 IST2014-11-14T00:43:58+5:302014-11-14T00:44:50+5:30
पन्नास टक्के पूर्ण : शासानाचा मंजूर निधी लवकरच मिळणार

‘गोकुळ’च्या शिरोळ सॅटेलाईट डेअरीचे काम प्रगतिपथावर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) च्या शिरोळ येथील ‘सॅटेलाईट डेअरी’चे काम प्रगतीपथावर आले आहे. जुलैपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधीही लवकरच मिळणार आहे.
राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ‘गोकुळ’ दुध संघाच्या शिरोळ येथील अद्ययावत दुध प्रक्रिया प्रकल्प (सॅटेलाईट डेअरी) व गोकुळ शिरगाव येथील दुग्ध शाळेचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करणे, ‘ईटीपी’ प्लांट उभारणे या दोन्ही प्रकल्पांसाठी शासनाकडून मिळणारा निधी जुलै महिन्यातच मंजूर झाला आहे.
शिरोळच्या प्रकल्पाची किंमत २४ कोटी ६६ लाख ९० हजार २०५ रुपये व शिरगाव येथील प्रकल्पाची किंमत २४ कोटी ९० लाख रुपये आहे. या प्रकल्पांसाठी पन्नास टक्के रक्कम दूध संघाची व उरलेली रक्कम शासनाकडून निधीच्या माध्यमातून असे सुत्र आहे. यावर्षीच्या सुरुवातीलाच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. दुध संघाने आपल्या खर्चातून युध्दपातळीवर काम करुन प्रकल्पाच्या कामाला प्रगतीपथाकडे नेले आहे. यापैकी शिरोळ येथील प्रकल्पाचे काम ५० टक्के तर शिरगाव येथील प्रकल्पाचे काम ३० टक्के झाले आहे. शासनाकडून मिळणारा निधी जुलै महिन्यात मंजूर झाला. परंतु रक्कम अद्याप दुध संघाला प्राप्त झाली नाही. लवकरच टप्प्याटप्प्याने मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)