शिरोळ : सहकारी तत्त्वावर चालणारे भांडार उभे करून ते चालविणे अडचणीचे ठरत आहे. महापूर आणि कोरोना कालावधीमध्ये दत्त भांडार एक दिवसही बंद न ठेवता ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंची सेवा देण्याचे केलेले काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.
येथील दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्थेच्या दत्त भांडारची ३८ वी वार्षिक साधारण सभा पार पडली. स्वागत करून दत्त भांडारचे अध्यक्ष दामोदर सुतार म्हणाले, ३८ वर्षांपूर्वी स्व. सा. रे. पाटील यांनी पाहिलेले दत्त भांडारचे स्वप्न आज खरे होत आहे. गणपतराव पाटील यांचा व्यापारी दृष्टिकोन, गाढा अभ्यास, सर्वांशी असलेले सलोख्याचे व जिव्हाळ्याचे ऋणानुबंध यामुळे गेल्या तीन वर्षांत दत्त भांडारची मोठी प्रगती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विषयपत्रिकेचे वाचन एस. ए. घोरपडे यांनी केल्यानंतर सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. याप्रसंगी दरगू गावडे, राजू पाटील, विनया घोरपडे, शामराव पाटील, सुहास मडिवाळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. व्ही. कुलकर्णी, तर डॉ. राजश्री पाटील यांनी आभार मानले.
फोटो - २९०१२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ येथील दत्त भांडारच्या वार्षिक सभेत गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.