वसंतराव मोहितेंकडून सहकाराचा वारसा पुढे चालविण्याचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:40+5:302021-02-05T07:05:40+5:30

हुपरी : सहकार चळवळीला आदर्शवत असलेल्या सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते यांच्या सहकार व सामाजिक चळवळीतील विचारांचा व आचारांचा वारसा ...

The work of carrying on the legacy of co-operation from Vasantrao Mohite | वसंतराव मोहितेंकडून सहकाराचा वारसा पुढे चालविण्याचे कार्य

वसंतराव मोहितेंकडून सहकाराचा वारसा पुढे चालविण्याचे कार्य

हुपरी : सहकार चळवळीला आदर्शवत असलेल्या सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते यांच्या सहकार व सामाजिक चळवळीतील विचारांचा व आचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालविण्याचे कार्य वसंतराव मोहिते यांनी प्रामाणिकपणे केले आहे. त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांनी प्रगतीच्या माध्यमातून त्यांनी सर्वांनाच मोहित करून टाकले आहे, असे प्रतिपादन सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

यळगूड (ता. हातकणंगले) येथील श्री हनुमान सहकार उद्योग समूहाचे संस्थापक व सहकारी चळवळीतील ज्येष्ठ सहकार महर्षी वसंतराव तात्यासाहेब मोहिते यांचा ८०वा अभीष्टचिंतन सोहळा, अमृतमहोत्सवी अमृतसिद्धी गौरव अंक प्रकाशन व श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषिपूरक सेवा संस्थेने उभारलेल्या २०० के डब्लू सोलर प्रकल्प उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यामध्ये व जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यामध्ये सहकार चळवळीचा सर्वांत मोठा वाटा आहे. या सहकार चळवळीला दूरदृष्टी देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम वसंतराव मोहिते यांच्यासारख्या अनेक प्रामाणिक दिग्गजांनी केलेले आहे. सहकारामध्ये कशा पद्धतीने काम करावे याचा वस्तुपाठ माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यांनी घेऊन पुढे वाटचाल सुरू ठेवली पाहिजे.

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, वसंतराव मोहिते यांचे सहकारातील कार्य व त्यांनी दिलेले योगदान खरोखरच एखाद्या दीपस्तंभासारखे आहे. सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते यांनी सर्वसामान्यांसाठी सहकार चळवळ अगदी तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले होते. त्यांचाच वारसा पुढे चालविण्याचे प्रामाणिक कार्य वसंतराव मोहिते यांनी केले आहे.

यावेळी आमदार राजू जयवंतराव आवळे, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, मानसिंग जगदाळे, आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक सुजितसिंह मोहिते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक भगवान पाटील यांनी आभार मानले.

--------::-------

-

फोटो ओळी- यळगूड(ता. हातकणंगले) येथील श्री हनुमान सहकार उद्योग समूहाचे संस्थापक वसंतराव तात्यासाहेब मोहिते यांच्या ८०व्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने त्यांचा व सुविद्य पत्नी प्रमिलादेवी मोहिते यांचा सत्कार खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजू आवळे, राहुल आवाडे, सुजितसिंह मोहिते, आदी उपस्थित होते.

Web Title: The work of carrying on the legacy of co-operation from Vasantrao Mohite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.