बस्तवडे बंधाऱ्याचे काम दोन वर्षांनंतर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:21 IST2021-04-26T04:21:17+5:302021-04-26T04:21:17+5:30
म्हाकवे : कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील अंतिम टप्प्यात आलेल्या बस्तवडे-आणूरदरम्यान पुलाचे काम दोन वर्षांपासून बंद होते. पुलासाठी जमिनी संपादित ...

बस्तवडे बंधाऱ्याचे काम दोन वर्षांनंतर सुरू
म्हाकवे
: कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील अंतिम टप्प्यात आलेल्या बस्तवडे-आणूरदरम्यान पुलाचे काम दोन वर्षांपासून बंद होते. पुलासाठी जमिनी संपादित करताना संबंधित शेतकऱ्यांशी भरपाईबाबत चर्चा, प्राथमिक बैठक, नोटीस अशी कोणतीही रीतसर कार्यवाही न करता त्यांना थेट अंतिम मूल्यांकनाच्या नोटिसा दिल्या. काहींच्या जमिनी बागायती असतानाही जिरायत दाखविली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले होते. भरपाईसंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत भरावाचे काम सुरू केले आहे. या पुलासाठी सुमारे दहा कोटींचा निधी मंजूर आहे.
१० जानेवारी २०१७ रोजी १०० मीटर लांब आणि साडेसात मीटर रुंदीचा पावसाळ्यातील वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन या पुलाचे काम सुरू केले. अत्याधुनिक यंत्रणा असल्यामुळे दीड-दोन वर्षांत हा पूल पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती.
गतवर्षी हा पूल उभारून दोन्ही बाजूला नळे टाकून भरावाचेही काही प्रमाणात काम झाले; परंतु दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी बंद पाडले होते.
चौकट
आणूरमधील १२ तर बस्तवडेमधील १५ शेतकऱ्यांचे नुकसान होते. काहीना भरपाई मिळाली; परंतु बागायती जमिनीच्या बांधाला बांध असणाऱ्या जमिनी जिरायती दाखवून भरपाईची रक्कम निम्म्यावर आणली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी ही भरपाई स्वीकारलेली नसल्याचे सचिन चौगुले व सुरेश चौगुले यांनी सांगितले.
२५ बस्तवडे पूल फोटो : आणूर-बस्तवडेदरम्यान वेदगंगा नदीवरील रखडलेल्या पुलानजीक भरावाचे सुरू असणारे काम.
(छाया : दत्तात्रय पाटील, म्हाकवे)