शिवसेनाप्रमुखांकडून मराठी माणसाला जागे करण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:06+5:302021-01-24T04:11:06+5:30
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या लिखाण आणि वक्तव्याने झोपी गेलेल्या मराठी माणसाला जागे करण्याचे काम केले ...

शिवसेनाप्रमुखांकडून मराठी माणसाला जागे करण्याचे काम
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या लिखाण आणि वक्तव्याने झोपी गेलेल्या मराठी माणसाला जागे करण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर विखुरलेला मराठी माणूस ताठ मानेने, स्वाभिमानाने जगू लागला. त्यांचे विचार प्रेरणादायी असून, त्यांचे अनुकरण समस्त नागरिकांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार पेठ, सोन्या मारुती चौक येथील शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने शनिवारी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
क्षीरसागर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी अखंडित ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवली. महाराष्ट्रात सत्तेत आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून भंबेरी उडविण्याची शक्ती व्यंगचित्रकार म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती त्यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. शिवसैनिक हा माझा प्राण, संपत्ती आणि ऊर्जा असल्याचे सांगत सामान्य शिवसैनिकाच्या हृदयात घर करणाऱ्या या असामान्य नेत्याने आपल्या अखेरच्या भाषणातही त्याचाच पुनरुच्चार केला होता. यावेळी माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, दीपक गौड, जयवंत हारुगले, सुनील जाधव, रघुनाथ टिपुगडे, तुकाराम साळोखे, सुनील खोत, रणजित जाधव आदी उपस्थित होते.
फोटो : २३०१२०२१ कोल शिवसेना राजेश न्यूज
ओळी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सोन्या मारुती चौक येथील शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, रवी चौगुले, दीपक गौड, जयवंत हारुगले, सुनील जाधव, रघुनाथ टिपुगडे, तुकाराम साळोखे आदी उपस्थित होते.