गडबडीने घळभरणी केल्याने आंबेओहोळ धरणाचे काम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:52+5:302021-05-19T04:24:52+5:30

उत्तूर : धरणग्रस्तांचे पुनर्वसन सध्या थांबले असून धरणाच्या घळभरणीचे काम मात्र पूर्ण होत आले आहे. पूर्वेकडील संपूर्ण लांबीवर पिचिंग ...

Work on the Ambeohol dam is in jeopardy due to disturbances | गडबडीने घळभरणी केल्याने आंबेओहोळ धरणाचे काम धोक्यात

गडबडीने घळभरणी केल्याने आंबेओहोळ धरणाचे काम धोक्यात

उत्तूर :

धरणग्रस्तांचे पुनर्वसन सध्या थांबले असून धरणाच्या घळभरणीचे काम मात्र पूर्ण होत आले आहे. पूर्वेकडील संपूर्ण लांबीवर पिचिंग न करता घळभरणी केली जात आहे. त्यातच अवकाळी पाऊस लागल्याने धरणाच्या पूर्व बाजूला माती बंधारा वाहून जाताना दिसत आहे. त्यामुळे आंबेओहोळ प्रकल्पाचे काम धोकादायक बनल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून कॉ. शिवाजी गुरव यांनी केले आहे.

पावसाळाभर अशीच स्थिती राहिल्यास धरणाच्या बांधाची बरीच माती वाहून जाणार आहे. आजपर्यंत जिल्ह्यात कोणत्या धरणाला एका बाजूने पिचिंग दगड लावणे असे झाले नाही. चित्रीपासून सर्व पूर्ण झालेल्या धरणांना दोन्ही बाजूने दगड लावून पिचिंग केले आहे. मात्र, धरणांमध्ये पाणी अडविण्याची घाई झाल्याने पूर्व बाजूची पिचिंग केले जाणार नसल्याचे समजते.

कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या धरणाला पिचिंग होणार नाही याचे शेतकरी व जाणकार मंडळी आश्चर्य व्यक्त करत आहेत. याचा धोका शेजारील शेतकऱ्यांना आहे. शिवाय धरणाला पावसाळ्यात भेगा पडणार आहेत. पहिल्याच पावसाने पडलेल्या भेगा(खागी) मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

अवकाळी पावसाचे पहिले थोडे पाणी धरणात साठलेले दिसत आहे. अजून घळभरणीचे काम पूर्ण झालेले नाही. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कामही कोरोना लॉकडाऊनमुळे थांबले आहे. आता धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय कोण देणार, असा प्रश्नही प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.

-------------------------

* धरणाला धोका नाही

प्रकल्पाच्या कामाचा धरणाला कोणताही धोका नाही. धरणाच्या पूर्वेकडील बाजूस दगडी पिचिंगची मंजुरी नाही. अतिवृष्टी असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूस पिचिंग असते. पाणी जाण्यास वाट असते. त्यामुळे धरणाला भेगा पडतात असे नव्हे. घळभरणीचे काम दोन मीटर शिल्लक आहे. योग्य ती खबरदारी घेऊन काम सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा विभाग आंबेओहोळ प्रकल्प यांनी दिली.

------------------------

-

फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्पात वळीव पावसाने झालेला पाणीसाठा.

क्रमांक : १८०५२०२१-गड-०१

Web Title: Work on the Ambeohol dam is in jeopardy due to disturbances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.