भाषणामधील ‘गोकुळ’शब्द झाला दूध व्यवसायातील ब्रँड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:12+5:302021-04-27T04:24:12+5:30

कोल्हापूर : एखाद्या संस्थेचे नाव वेगळे असते आणि त्या संस्थेच्या उत्पादनांचा ब्रँड वेगळा होतो. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा ...

The word 'Gokul' in the speech became a brand in the milk business | भाषणामधील ‘गोकुळ’शब्द झाला दूध व्यवसायातील ब्रँड

भाषणामधील ‘गोकुळ’शब्द झाला दूध व्यवसायातील ब्रँड

कोल्हापूर : एखाद्या संस्थेचे नाव वेगळे असते आणि त्या संस्थेच्या उत्पादनांचा ब्रँड वेगळा होतो. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा ‘गोकुळ’ हा ब्रँड कसा तयार झाला याचीही कहाणी मनोरंजक आहे. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या एका भाषणात वापरलेला हा शब्द पुढे राष्ट्रीय पातळीवरचा दुध व्यवसायातील ब्रॅन्ड झाला.

दूध व्यवसाय वाढवण्यासाठी गावोगावी दूध संस्था उभारल्या जात होत्या. त्यांच्या इमारती बांधण्यासाठी शक्य ते अर्थसहाय्यही जिल्हा दूध संघाच्यावतीने दिले जात होते. आनंदराव पाटील-चुयेकर आणि १९८२-८३ च्या दरम्यान आमदार असलेले श्रीपतराव बोंद्रे यांचे चांगले संबंध. मुंबईत मंत्रालयात एखादे काम असेल, कोण्या मंत्र्यांना भेटायचे असेल तर चुयेकर बोंद्रे यांना घेऊन जात. याचदरम्यान गोकुळ शिरगाव येथील कृष्णा दूध संस्थेच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ होता. चुयेकर यांनी या इमारतीच्या उद्घाटनासाठी श्रीपतराव बोंद्रे यांना निमंत्रित केले होते. दूध संघाचे सर्व संचालक, अधिकारी, एनडीडीबीचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये भाषण करताना चुयेकर म्हणाले, ‘कोल्हापुरात दूध प्रकल्प सुरू झाला. त्याचबरोबर ‘आनंद पॅटर्न’ येथे राबविला गेला. दूध महापूर योजना सुरू झाली. या गोकुळ शिरगावमध्येच मुख्य डेअरीचे काम होत आहे म्हणजेच खऱ्या अर्थाने येथे ‘गोकुळ’ नांदणार आहे.’ चुयेकर यांच्या भाषणातील ‘गोकुळ’ हा शब्द अधिकाऱ्यांना भावला. त्यांनी सुचविले की या प्रकल्पाला आपण ‘गोकुळ’ हे नाव देऊया. सर्वांनाच ते मान्य झाले. सर्वसाधारण सभेत तसा ठराव झाला आणि हा ‘गोकुळ’ ब्रँड पुढे नावारूपाला आला.

चौकट

ग्रामविकासामध्ये’गोकुळ’चा मोठा सहभाग

वीस वर्षे जिल्हा दूध संघाचे आनंदराव पाटील यांनी नेतृत्व केल्यानंतर १९९० मध्ये अरुण नरके यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. संघाला एक उच्चशिक्षित आणि नवी दृष्टी असणारे नेतृत्व लाभले. नरके यांनी केवळ दूध खरेदी, विक्री यातच लक्ष घातले नाही तर व्यवहाराला शिस्त लावली. गगनबावडा तालुक्यातील एका गावात ते एकदा कार्यक्रमाला गेले होते. पावसाळ्याचे दिवस होते. रस्त्यावरून गटार वाहत होते. तेथून आल्यानंतर नरके यांनी संघाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्या गावातून आपण दूध संकलन करतो त्या गावासाठीही काही तरी केले पाहिजे असे ठरले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर गावच्या विकासाला हातभार लावणारी ‘गोकुळ ग्रामविकास’ योजना सुरू झाली.

Web Title: The word 'Gokul' in the speech became a brand in the milk business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.