रामायण’ घडविणारे ‘ते’ रावण आहेत का?; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
By राजाराम लोंढे | Updated: August 27, 2022 22:37 IST2022-08-27T22:37:00+5:302022-08-27T22:37:42+5:30
दहीहंडीच्या कार्यक्रमात ‘आता जिल्ह्यात महाभारत सुरु होईल’ असा इशारा खासदार महाडीक यांनी दिला होता. त्यावर आम्ही महाभारत नाहीतर रामायण घडवणारे आहोत असा पलटवार आमदार पाटील यांनी केला होता.

रामायण’ घडविणारे ‘ते’ रावण आहेत का?; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
काेल्हापूर : रामायण घडवणारे आहोत, असे सांगणारे रावण आहेत का? अशी विचारणा करत गर्विष्ट, घमेंडखोर , क्रुर रावणाने सीतेचे हरण केल्याने रामायण घडले आणि सोन्याच्या लंकेची राख झाली, हे लक्षात ठेवावे, अशी टीका खासदार धनंजय महाडीक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
दहीहंडीच्या कार्यक्रमात ‘आता जिल्ह्यात महाभारत सुरु होईल’ असा इशारा खासदार महाडीक यांनी दिला होता. त्यावर आम्ही महाभारत नाहीतर रामायण घडवणारे आहोत असा पलटवार आमदार पाटील यांनी केला होता. त्यावर बोलताना खासदार महाडीक म्हणाले, कैकयीने कपटाने प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवले होते. त्याच कपटी कारस्थानाचा मी बळी पडलो आणि माझा घात झाला. त्यातून आपण जिल्ह्यात महाभारत होईल असे म्हटलो. रामायण रावणामुळे घडवले, ते स्वताला रावण समजतात का? जर राम समजत असतील तर प्रभू रामचंद्र हे एक वचनी, एक पत्नी होते. आम्हाला रणांगण नवीन नाही पण सत्तेचा उन्माद इतका बरा नसतो.
‘गोकुळ’च्या सत्तेत आम्हाला स्वारस्य नाही
राज्यातील सत्ता नाट्यानंतर ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन करणार का? असे विचारले असता, ‘गोकुळ’च्या सत्तेत आम्हाला स्वारस्य नाही. हिसकावून घेण्याची आमची पध्दत नाही, केवळ संघाची अधोगती थांबवणे एवढेच आपले काम असल्याचे खासदार महाडीक यांनी सांगितले.