बसर्गेतील स्पर्धेत महिलांच्या उत्स्फुर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 15:41 IST2017-07-13T15:41:08+5:302017-07-13T15:41:08+5:30
स्वयंसिद्धा संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आर्थिक साक्षरता कार्यशाळा

बसर्गेतील स्पर्धेत महिलांच्या उत्स्फुर्त सहभाग
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातीय बसर्गे येथे घेण्यात आलेल्या टाकाऊ कापडापासून विक्रीयोग्य वस्तूंच्या स्पर्धेमध्ये पंधरा आणि पापडाच्या स्पर्धेमध्ये बाविस महिलांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला. टाकाऊ कापडाच्या स्पर्धेमध्ये नंदा भेंडवाडे यांना गोधडी शिवण्यासाठी आणि राजमाता महिला बचत गटाला पापड निर्मितीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले.
ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या स्वयंसिद्धा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बसर्गेमध्ये महिला व युवतींसाठी टाकाऊ कापडापासून विक्रीयोग्य वस्तू व विविध प्रकारचे पापड या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
दोन्ही स्पर्धांचे परीक्षण स्वयंसिद्धाच्या तज्ञ व अनुभवी समीक्षिका संगीता जाधव आणि मंदा आचार्य यांनी केले. दोन्ही स्पर्धांमध्ये प्रत्येकी तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच बक्षिसे वितरीत करण्यात आली.
स्पर्धांसोबत याप्रसंगी घेण्यात आलेल्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेमध्ये स्वयंप्रेरिका सहकारी महिला औद्योगिक संस्थेच्या उपाध्यक्षा सौम्या तिरोडकर आणि सेन्ट्रल बँकेच्या निवृत्त अधिकारी सुमेधा पंडित यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये जन-धन, अटल पेन्शन, प्रधानमंत्री सुरक्षा व जीवनज्योती विमा इत्यादि शासकीय योजनांची माहिती व महत्व समजावून सांगण्यात आले. खेळ, गटचर्चा व गाण्यांच्या माध्यमातून बचतीचे महत्व सांगण्याबरोबर घर व उद्योगाच्या खर्चाचे नियोजन कसे करावे आणि प्राधान्यक्रम कसा ठरवावा याविषयी प्रबोधन करण्यात आले.
नव्वद महिलांचा उत्स्पूर्त प्रतिसाद व उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन स्वयंसिद्धा संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीने बसर्गे ग्रामपंचायत सदस्य रूपा हिरेमठ आणि शुभांगी येडूरकर यांनी केले. स्पर्धांच्या बक्षिस वितरण समारंभाला बसर्गेचे उपसरपंच सुरेश मणिकेरी यांची प्रमुख उपस्थिती होती.