कुरुंदवाड पालिकेवर महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:51+5:302021-03-26T04:23:51+5:30
कुरुंदवाड : शहर स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील महिला बचत गटाचे प्रशिक्षण आणि शहराचे सौंदर्यीकरण कार्यक्रमासाठी नगरपालिकेने २०१९-२० सालात ...

कुरुंदवाड पालिकेवर महिलांचा मोर्चा
कुरुंदवाड : शहर स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील महिला बचत गटाचे प्रशिक्षण आणि शहराचे सौंदर्यीकरण कार्यक्रमासाठी नगरपालिकेने २०१९-२० सालात २ लाख ८२ हजार ६०० रुपये इतका खर्च दाखविण्यात आल्याने या खर्चाचा हिशोब देण्यात यावा, या मागणीसाठी शहरातील महिला बचत गटाच्या महिलांनी कुरुंदवाड नगरपालिकेवर मोर्चा काढला. मुख्याधिकारी निखिल जाधव यांना जाब विचारल्याने याबाबत दोन दिवसांत माहिती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या.
दरम्यान, सोमवारपर्यंत माहिती न मिळाल्यास शहरातील सर्व महिला बचत गटांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला बचत गट समन्वयिका सुमन पाटील यांनी दिल्याने पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी गत वर्षातील स्वच्छ सर्वेक्षण अभियनावर खर्च करण्यात आलेली माहिती माहिती अधिकारातून मिळविली आहे. यामध्ये बचत गटांना प्रशिक्षण देणे, शहर सौंदर्यीकरणावर २ लाख ८२ हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आल्याने महिला बचत गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत याचा जाब विचारण्यासाठी महिलांनी पालिकेवर मोर्चा काढला.
महिलांनी मुख्याधिकारी कक्षात जाऊन मुख्याधिकारी जाधव यांना खर्चाबाबत विचारणा केली. २०१८ नंतर महिलांसाठी कोणतेही प्रशिक्षण झाले नसताना खर्च कसा झाला याची विचारणा करीत बचत गटासाठी कोणते खर्च केले याची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी जाधव यांनी विभागाची माहिती घेऊन दोन दिवसांत माहिती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या.
मोर्चामध्ये मिनाज पठाण, स्वाती मोहिते, नूतन नलवडे, सविता सूर्यवंशी, प्रेमलता वाळवेकर यांच्यासह शहरातील महिला सहभागी झाल्या होत्या.
फोटो - २५०३२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - कुरुंदवाड पालिकेवर महिला बचत गटातील महिलांनी मोर्चा काढला.