कऱ्हाड तहसीलवर महिलांचा मोर्चा
By Admin | Updated: January 21, 2015 23:50 IST2015-01-21T22:18:04+5:302015-01-21T23:50:10+5:30
कारवाईची मागणी : स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानीचा निषेध

कऱ्हाड तहसीलवर महिलांचा मोर्चा
कऱ्हाड : रेशनिंग दुकानदार सामान्यांशी उद्धट वर्तन करतात. तसेच ग्राहकांना वेळेवर धान्यवाटप केले जात नसल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत असून, या उद्धटगिरी करणाऱ्या रेशनिंग धान्य दुकानदारांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी शहरातील मंगळवार पेठेतील महिलांनी बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. रेशनिंग दुकानदारांच्या मनमानीचा महिलांनी तीव्र शब्दात निषेध केला. तसेच मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांना देण्यात आले. लोकशासन आंदोलनाच्या माध्यमातून येथील मंगळवार पेठेतील शंभरहून अधिक महिलांनी मंगळवार पेठेतून तहसील कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा काढला. मोर्चावेळी लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष बी. जी. कोळसे-पाटील, अॅड. मनीषा रोटे, विजय क्षीरसागर, नितीन कचरे, सुमन कोळी, फरजाना कच्छी, जोहरा कच्छी, सीमा माने, सुनंदा उबाळे, जयश्री जाधव, कमल शेवाळे, अंजना देशमुख, विजया भोसले आदींसह मंगळवार पेठेतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कऱ्हाड शहरातील रेशनिंगविक्री करणाऱ्या २८ शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य पुरवठ्याबाबत योग्य माहिती न देता तसेच धान्याचा बाजारभावही न सांगता फक्त तोंड बघून धान्यवाटप केले जाते. तसेच धान्य विक्रेत्यांकडून काळाबाजारही केला जात आहे. त्यामुळे या बेकायदेशीरपणे धान्यविक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी तहसीलदारांकडे केली.दुकानदारांनी गाळ्यासमोर वाटपाबाबत येणाऱ्या धान्याविषयी ग्राहकांना सविस्तर माहिती द्यावी, दुकानदारांनी महिलांशी सभ्यपणे वागावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
दुकानास टाळे ठोकणार
उर्मटपणे वागणाऱ्या धान्य दुकानदारांवर शासनाने आठ दिवसांमध्ये कारवाई न केल्यास सर्व महिला या दुकानदारांच्या दुकानास टाळे ठोकतील. तसेच यापुढे तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, असा इशारा मंगळवार पेठेतील महिलांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.