महिला स्वातंत्र्यसैनिक तांबट, हविरेंच्याही संघर्षाची नोंद व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:47 IST2017-01-21T00:47:45+5:302017-01-21T00:47:45+5:30
शिवाजी चौक सुशोभीकरण : खरा इतिहास जनतेला माहिती होणे गरजेचे

महिला स्वातंत्र्यसैनिक तांबट, हविरेंच्याही संघर्षाची नोंद व्हावी
कोल्हापूर : ‘लोकमत’मधील १९ जानेवारी २०१७ चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भातील लेख वाचला. त्यानंतर २० जानेवारी २०१७ च्या ‘लोकमत’मधील माजी महापौर भिकशेठ पाटील यांची त्यावरील टिप्पणीही वाचली. याबाबत शिवाजी पुतळा सुशोभीकरणाच्या दृष्टीने आमदार राजेश क्षीरसागर यांना समक्ष तारीखवार माहिती मी स्वत: दिली आहे. गव्हर्नर विल्सनचा पुतळा बसविला तो १९२९ मध्ये. या पुतळ्यावर डांबर मारून विद्रूप केला तो १० आॅक्टोबर १९४२ या घटनेस्थापनेच्या दिवशी. या घटनेला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. (‘लोकमत’मध्ये १९९३ मध्ये त्यास शंभर वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख आला आहे, तो चुकीचा आहे.)
महिला स्वातंत्र्यसैनिक श्रीमती भागीरथीबाई दत्तोबा तांबट (सोबत त्यांचा चार वर्षांचा मुलगा होता. तो सध्या ८१ वर्षांचा असून, निशिकांत तांबट असे त्यांचे नाव आहे. सध्या ते राजारामपुरी नवव्या गल्लीत राहतात) व श्रीमती जयाबाई सिदलिंग हविरे या बहाद्दर महिलांनी १० डिसेंबर १९४२ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या पुतळ्यावर डांबर, अॅसिड फेकून तो विद्रूप केला. तो पुतळा नंतर ब्रिटिश प्रशासनाने चार महिने झाकून ठेवला. वर्षभरानंतर शंकरराव दत्तात्रय माने, अहमद शाबाजी मुल्ला यांच्या पुढाकाराने काका देसाई, कुंडल देसाई, शामराव लहू पाटील, नारायण घोरपडे, नारायण जगताप, पांडुरंग बळवंत पोवार, माधवराव घाडगे, आबू जाधव यांनी भर पहाटे पुतळ्यावर घणाचे घाव घातले व तो फोडला. यावेळी माधवराव कुलकर्णी व वासुदेव ऊर्फ बाबूराव देशपांडे यांनी गर्दीचे नियंत्रण केले. अखेर १९४३ मध्ये सरकारला हा पुतळा हटवावा लागला. या जागेवर पुन्हा विल्सनचा पुतळा बसविला जाऊ नये म्हणून शिवभक्त भालजी पेंढारकर यांनी १३ मे १९४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शिल्पकार बाबूराव पेंटर यांच्याकडून करवून घेतला व तिथे बसविला गेला.
विल्सनच्या पुतळ्याला डांबर फासल्याबद्दल भागीरथी तांबट व जयाबाई हविरे यांना अटक झाली. या गोष्टीला २०१७ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यामध्ये न्यायालयास बांगड्यांचा आहेर केल्याबद्दल, न्यायालयाच्या अवमानाबद्दल त्यांना दीड वर्ष शिक्षा ठोठावण्यात आली. राजबंदी कैद्यांची माहिती तत्कालीन सरकारी गॅझेटमध्ये नोंद आहे. तुरुंगातील शिक्षेची प्रमाणपत्रेही आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे आता सुशोभीकरण होत असताना हा देदीप्यमान इतिहास आजच्या पिढीला समजणे महत्त्वाचे आहे. म्हणून या महिला स्वातंत्र्यसैनिक, पुतळा फोडणारे स्वातंत्र्यसैनिक व शिवभक्त भालजी पेंढारकर यांची नोंद नव्याने सुशोभीकरण होताना घेतली जाणे आवश्यक आहे. ती घेतली जावी व खरा इतिहास जनतेला माहीत व्हावा, यासाठीच हा पत्रप्रपंच केला आहे.
- शरद तांबट
२०१ अ, शिवाजी पेठ, कोल्हापूर
(मो : ९४२३८६०८४०)