प्रचार न करताही महिला उमेदवार विजयी
By Admin | Updated: August 3, 2015 00:27 IST2015-08-03T00:19:02+5:302015-08-03T00:27:46+5:30
लिंगनूर कापशी ग्रामपंचायत निवडणूक : दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देऊनही यश

प्रचार न करताही महिला उमेदवार विजयी
कागल : ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. उमेदवारांनी निवडून येण्यासाठी जे जे शक्य आहे तितके केले. हात सैल सोडले. पत्रके, जाहिराती काढल्या. जेवणावळी ठेवल्या. रोज सांज-सकाळ भेठीगाटी, पदयात्रा काढल्या. मतदारांच्या घरांचे उंबरठे झिजविले. प्रत्यक्ष मतदानादिवशी दिवसभर हात जोडले. तरी काहींना यश, तर काहींना अपयश आले; पण यापैकी काही एक न करता, गावाबाहेर राहूनही लिंगनूर दुमाला (ता. कागल) येथील लक्ष्मी अनिल संकपाळ या निवडून आल्या.लिंगनूर दुमाला येथे या निवडणुकीसाठी आमदार मुश्रीफ गटाविरुद्ध राजे-घाटगे-मंडलिक गट असे तिघे एकत्र येऊन पॅनेल केले. अनिल संकपाळ हे विक्रमसिंह घाटगे गटाचे कार्यकर्ते होते. प्रभाग तीनमधून महाआघाडीचे तीन अर्ज भरले. त्यामध्ये जयश्री नाना संकपाळ (राजे गट), सुनीता शिवाजी कुंभार (मंडलिक गट) आणि लक्ष्मी अनिल संकपाळ (संजय घाटगे गट) ओबीसी राखीव प्रवर्गासाठी या तीनपैकी एकाचे नाव निश्चित करण्यासाठी एकमत होत नव्हते. शेवटी सुनीता कुंभार यांना महाआघाडीतर्फे उमेदवारी दिली. जयश्री संकपाळ यांनी माघार घेतली, तर वेळेत माघार घेता आली नाही म्हणून लक्ष्मी संकपाळ यांचा अर्ज तसाच राहिला. तर प्रतिस्पर्धी गटाच्या म्हणजे मुश्रीफ गटाच्या कमल परसू गोंधळी यांचा अर्ज छाननीत उडाला. त्यामुळे सुनीता कुंभार आणि लक्ष्मी संकपाळ असे आघाडीच्या दोघींचे अर्ज शिल्लक राहिले. आघाडीत खोडा नको म्हणून लक्ष्मी संकपाळ यांनी सुनीता कुंभार यांना पाठिंबा जाहीर करून कुटुंबासह माहेरी गोकाकला गेल्या. मतदान करून लगेचच परत गोकाकला गेल्या. मात्र, निकालादिवशी त्यांना २८४ मते पडल्याचे, तर सुनीता कुंभार यांना २५५ मते पडल्याचे स्पष्ट झाले. कोणता खर्च नाही, संपर्क नाही, त्यांना आयती संधी मतदारांनी दिली. आता मुश्रीफ गटाचा उमेदवार तेथे नसणे हे देखील त्यांच्या पथ्यावर पडले. पण, कसे का असेना निवडणुकीच्या काळात माहेरी थांबून विजयाची किमया या निमित्ताने त्यांनी साधली. (प्रतिनिधी)