स्त्रियांनी स्वावलंबी होण्याची गरज
By Admin | Updated: May 29, 2015 00:01 IST2015-05-28T23:47:57+5:302015-05-29T00:01:21+5:30
भारती पाटील : मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे--ज्ञानदीप व्याख्यानमाला

स्त्रियांनी स्वावलंबी होण्याची गरज
सोनी : स्त्रियांनी स्वावलंबी आणि धाडसी बनावे. कोणतेही कार्य करताना समाज काय म्हणेल, याचा विचार न करता जर आपले काम चोख व प्रामाणिकपणे केल्यास समाजात वेगळे स्थान नक्कीच मिळेल. यासाठी शिक्षण आवश्यक असल्याने मुलींच्या शिक्षणाकडे पालकांनी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्त्रियांनी नेहमी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे समाजात स्त्रियांना मान-सन्मान मिळेल, असे मत कवयित्री डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले.
सोनी (ता. मिरज) येथे ज्ञानदीप ग्रुपतर्फे आयोजित ज्ञानदीप व्याख्यानमालेत गुरव यांनी ‘स्त्रियांचे समाजातील आजचे स्थान’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. त्या म्हणाल्या की, आज मुलींना शिक्षण दिले जात आहे. काळ बदलला, पण ग्रामीण भागात २० ते ३० टक्केच परिवर्तन दिसते. स्त्रियांना अजूनही हवा तेवढा पोषण आहार मिळत नाही, ही खंत आहे. चाळीशी पार केल्यानंतर सर्वसाधारण सर्वच स्त्रियांमध्ये मानसिक कमकुवतपणा येतो. या काळात खरं तर त्यांना मानसिक आधाराची गरज असते व ती मिळणे गरजेचे असते. शासनाने चालू केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून स्त्रिया सक्षम व स्वावलंबी व्हाव्यात, हा हेतू आहे. पण त्यातून कर्ज काढण्याव्यतिरिक्त कोणतेच काम केले जात नाही. बचत गटातील पैशातून स्त्रियांनी लहान-मोठे उद्योग करावेत, त्यासाठी गटातील प्रत्येक स्त्री ही मनाने एकरूप झाली पाहिजे. राजकारण व समाजकारणामध्ये आता स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत असून, या क्षेत्रातही महिलांनी अभ्यासू व कार्यक्षम होणे गरजेचे आहे.
यावेळी पाटील यांनी स्त्री जीवनावरील काही कविता सादर केल्या. यावेळी वातावरण भावूक झाले होते. नरेंद्र जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर पी. बी. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)