महिलांना लुटणाऱ्या टोळीस अटक
By Admin | Updated: August 23, 2014 00:07 IST2014-08-23T00:04:57+5:302014-08-23T00:07:41+5:30
आंतरराज्य टोळी : महिलेसह सहाजण गजाआड; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

महिलांना लुटणाऱ्या टोळीस अटक
कोल्हापूर : राज्य महामार्गावर प्रवासी महिलांना गाडीत घेऊन लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीस कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दोन चारचाकी वाहने असा सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेले संशयित बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील असून, या टोळीतील अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
तुकाराम ऊर्फ नाना बाबू मुंडे (वय २९, रा. भोगलवाडी, ता. धारूर, जि. बीड), आक्का तुकाराम मुंडे (३७ ), राम भैरी इटकर (२१, रा. सोनारी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), गोकुळ तुकाराम इटकर, साधू आत्माराज ढिगारे (दोघे रा. सोनारी), ईश्वर चंद्रकांत दुबळे (२५, रा. सोनारी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने सोमवार (दि. २५) पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित /गोयल यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या टोळीतील एका महिलेसह तिघांचा शोध सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले.गोयल म्हणाले, काही दिवसांपूर्वी अंबप फाट्यावर एका प्रवासी महिलेस त्यांनी आपल्या चारचाकी गाडीत घेतले. त्या महिलेच्या अंगावरील दागिने व मोबाईल काढून घेतला. दरम्यान, याप्रकरणी वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना या गुन्ह्यातील टोळी उस्मानाबाद व बीड या जिल्ह्यांतील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक या जिल्ह्यामध्ये गेले. पोलिसांनी संशयित तुकाराम मुंडे, आक्का मुंडे, राम इटकर या तिघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तिघांना अटक केली. तपासात संशयित साधू ढिगारे, गोकुळ इटकर हेही असल्याचे निष्पन्न झाले. इंदापूर पोलीस ठाण्याकडे अटकेत असलेल्या साधू ढिगारेला तर संशयित गोकुळ इटकर व ईश्वर दुबळे यांना सोनारी येथून अटक केली. या टोळीतील अशोक सांगळे (रा. बीड), नजीर (पूर्ण नाव माहीत नाही) व पप्पी (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघा संशयितांचा शोध सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले.
या टोळीचा छडा पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रमेश ढाणे, हमीद शेख, आदींनी लावला.