कोल्हापूर : कळंबा येथील एलआयसी कॉलनीत घरगुती गॅस स्फोटात गंभीर जखमी झालेल्या शीतल अमर भोजणे (वय २९, रा. एलआयसी कॉलनी, कळंबा) यांचा उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २६) पहाटे सीपीआरमध्ये मृत्यू झाला.
त्यांचे सासरे अनंत भोजणे (६०) यांची प्रकृती गंभीर असून, मुलगा प्रज्वल (साडेपाच वर्षे) आणि मुलगी इशिका (तीन वर्षे) यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली असून, घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे.पाइपलाइनद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कनेक्शन दिल्यानंतर काही तासांतच कळंबा येथील अमर भोजणे यांच्या घरात गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाला. सोमवारी (दि. २५) रात्री पावणेअकराच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत अमर भोजणे यांच्या पत्नी शीतल, वडील अनंत, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिका गंभीर जखमी झाले होते.
वाचा- गणेशोत्सवाला कोकणात जाण्यापूर्वीच भोजने कुटुंबावर काळाचा घाला, गॅस स्फोटाने कुटुंब उद्ध्वस्तउपचारादरम्यान मंगळवारी पहाटेच्या शीतल यांचा मृत्यू झाला. स्फोट झाला त्यावेळी स्वयंपाक घरातच असल्याने त्या १०० टक्के भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचे सासरे अनंत भोजणे यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. दोन्ही मुलांची प्रकृती स्थित असून, स्फोटामुळे त्यांना धक्का बसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.प्लंबरकडून गॅस कनेक्शनची जोडणी?घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने कनेक्शन जोडणीचे काम काही ठेकेदारांना दिले आहे. संबंधित ठेकेदाराकडून विनाप्रशिक्षित कर्मचाऱ्यांद्वारे कनेक्शन जोडणीची कामे केली जात आहेत. यात काही प्लंबर असल्याची माहिती भोजणे यांच्या शेजाऱ्यांकडून मिळाली. गॅस जोडणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच झालेल्या दुर्घटनेबद्दल नागरिकांनी ठेकेदारासह काही कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. तसेच काही रहिवाशांनी जोडलेले गॅस कनेक्शन काढून घेतले.
फॉरेन्सिककडून तपासणीजुना राजवाडा पोलिसांनी गॅस स्फोटाचा पंचनामा करून जखमींचे जबाब नोंदवले. तसेच फॉरेन्सिकच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. स्फोटाच्या कारणाचा शोध घेण्यासाठी काही पुरावे त्यांनी जमा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.