डालग्यातून रुग्णालयात नेताना महिलेची वाटेतच प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:31+5:302021-06-20T04:17:31+5:30

कोल्हापूर-गारगोटी : घटना दिनांक ६ जूनची, गर्भवतीची प्रकृती बिघडली, काट्याकुट्याची वाट तुडवून रस्त्याला लागेपर्यंत बाळाने जन्मापूर्वीच जग सोडले, त्यानंतर ...

The woman gave birth on the way to the hospital | डालग्यातून रुग्णालयात नेताना महिलेची वाटेतच प्रसूती

डालग्यातून रुग्णालयात नेताना महिलेची वाटेतच प्रसूती

कोल्हापूर-गारगोटी : घटना दिनांक ६ जूनची, गर्भवतीची प्रकृती बिघडली, काट्याकुट्याची वाट तुडवून रस्त्याला लागेपर्यंत बाळाने जन्मापूर्वीच जग सोडले, त्यानंतर बरोबरच १२ दिवसांनी आणखी एक गर्भवती अडली, डालग्याच्या डोलीतून खांद्यावरून मुख्य रस्त्यापर्यंत नेईपर्यंत वाटेतच प्रसूती झाली आणि तीही भरपावसात, थंडी वारा झेलत बाळ या जगात प्रवेशकर्ते झाले.

भुदरगड तालुक्यातील वासनोली व एरंडपे या धनगर वाड्यावर १२ दिवसांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटना धनगरवाड्यावरील लोकांच्या जगण्याचे दशावतार मांडणाऱ्या आणि आधुनिक जगात आहोत, असे म्हणण्याची लाज वाटणाऱ्या, सेंकदाच्या वेगाने धावणाऱ्या या जगात दोन-तीन किमीचे अंतर म्हणजे एक-दोन मिनिटांचा खेळ, पण जंगलातील वाड्यावस्त्यातील लोकांसाठी मात्र हाच जीवनमरणाचा खेळ ठरत आहे. मुख्य रस्त्यालगत जाणारा अवघा दोन किमीचा पक्का रस्ता नसल्याने जीवनमृत्यूशी टोकाचा संघर्ष करत देवाच्या भरवशावर जगणे सोडणाऱ्या या घटनांकडे मात्र प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्षच जात नाही, हे त्यापेक्षाही दुर्देैवी!

भुदरगड तालुक्यात एरंडपे धनगरवाडा हा मुख्य रस्त्यापासून अवघा तीन किमी अंतरावर. पण पक्का रस्ता नसल्याने रुग्णांना येथून रस्त्यावर नेणे तितकेच अवघड काम. सुनीता सचिन फाेंडे या २४ वर्षीय गर्भवतीला या रस्त्यावरून वेळेत उपचारासाठी पोहचता आले नाही आणि बाळाला जीव गमवावा लागला. त्यानंतर असाच प्रकार वासनोली या धनगरवाड्यावर देखील घडला. संगीता वैभव पटकारे या २३ वर्षीय गर्भवतीला प्रसववेदना सुरू झाल्याने उपचारासाठी घेऊन जायचे तर रुग्णवाहिकाच येऊ शकत नव्हती. मग कुटुंबीय, शेजारपाजाऱ्यांनी डालग्याची डोली करून खांद्यावरून भर पावसात नेण्यास सुरुवात केली. अर्धी वाट तुडवल्यानंतर भरपावसात डोलीतच बाळाचा जन्म झाला. त्यानंतर मुख्य रस्त्याला येऊन तेथे थांबलेल्या रुग्णवाहिकेतून तिला दवाखान्यात पोहोचवण्यात आले.

चौकट

अजून किती आणि कुठंवर सोसायचे?

धनगरवाड्याकडे जाण्यासाठी अजूनही पायवाटच आहे. तेथे रस्ते व्हावेत, अशी मागणी करूनदेखील काेणीही याकडे लक्ष देत नाही. रस्ता नाही म्हणून उपचार नाही आणि उपचार वेळेत नाही म्हणून जीव वाचत नाही, अशा घटना कायम घडतात. त्यातही पावसाळ्यात याचे प्रमाण जरा जास्तच असते. गेल्या वर्षी म्हासुर्ली धनगरवाड्यावर सर्पदंश झालेला शाळकरी मुलगा व गर्भवती महिलेला वेळेत दवाखान्यात नेता आले नाही, म्हणून जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अजून किती आणि कुठंवर साेसायचे असा प्रश्न ही पिढी विचारू लागली आहे.

१९०६२०२१-कोल-धनगरवाडा

फोटो ओळ : भुदरगड तालुक्यातील वासनोली धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाडीवर रुग्णवाहिका जात नाही. मग डालग्याची डोली करून खांद्यावरून असे बाळंतीण महिलेस मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन यावे लागते.

Web Title: The woman gave birth on the way to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.