बुजवडे येथे कालव्यात पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST2021-05-05T04:41:02+5:302021-05-05T04:41:02+5:30
बुजवडे (ता. राधानगरी) येथील सोनाबाई भीमराव पाटील (वय ५५) या महिलेचा कालव्यात पडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद राधानगरी ...

बुजवडे येथे कालव्यात पडून महिलेचा मृत्यू
बुजवडे (ता. राधानगरी) येथील सोनाबाई भीमराव पाटील (वय ५५) या महिलेचा कालव्यात पडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी सोनाबाई कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्या. त्या रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने पतीने गावकऱ्यांचा मदतीने सर्वत्र शोधाशोध केली. मात्र त्या सापडल्या नाहीत. आज सकाळी शेताकडून आल्यामुळे कालव्यात पाणी पिण्यासाठी व हात-पाय धुण्यासाठी गेल्याची शक्यता गृहीत धरून सकाळी कालवा परिसरात शोध घेतला. पण कालव्याला पाणी जास्त असल्यामुळे ते बंद करून शोधमोहीम राबवली असता तेथून साधारण पाच किलोमीटर अंतरावर कुडूत्री गावच्या हद्दीत कालव्यातील जोहार डोहात तिचा मृतदेह सापडला.
सोनाबाई यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मोलमजुरी केल्याशिवाय चूल पेटत नव्हती. गरिबीतही जीवन जगणाऱ्या सोनाबाईंचा आकस्मिक मृत्यूने सारा गाव हळहळला आहे. तिच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. ग्रामीण रुग्णालय, सोळांकुर येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
फोटो-सोनाबाई पाटील