तपासी अधिकारी झा यांची साक्ष
By Admin | Updated: June 12, 2015 00:54 IST2015-06-12T00:51:28+5:302015-06-12T00:54:15+5:30
महिला पोलीस लैंगिक शोषण प्रकरण : संशयित आरोपींची १७ जूनला उलटतपासणी

तपासी अधिकारी झा यांची साक्ष
कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलामध्ये २०११ मध्ये झालेल्या महिला पोलीस लैंगिक शोषण प्रकरणी तपासी अधिकारी मैथिली झा यांची गुरुवारी प्रथम वर्ग न्यायाधीश एम. बी. तिडके यांच्यासमोर साक्ष झाली. कोल्हापूर पोलीस दलामध्ये २०११ मध्ये नागपूर येथून ट्रेनिंग संपवून आलेल्या महिला कॉन्स्टेबलचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संशयित कॉन्स्टेबल युवराज कांबळे याच्याविरोधात पीडित महिला कॉन्स्टेबलने २४ जुलै २०११ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दुर्याेधन पवार यांच्याकडे दिला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासांत संशयित म्हणून तत्कालीन गृह पोलीस उपअधीक्षक विजय परकाळे व शाहूपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे यांचीही नावे पुढे आली. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले. गृहविभागाने या प्रकरणाचा तपास नाशिकच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक मैथिली झा यांच्याकडे वर्ग केला.
झा यांनी कोल्हापुरात येऊन याप्रकरणी पीडित महिला कॉन्स्टेबल, तिची आई, पोलीस मित्रांसह काही पोलीस, ‘सीपीआर’मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल व डॉक्टरांचा जबाब घेतला. त्याचबरोबर संशयित आरोपी कांबळे याच्यासह विजय परकाळे व ज्ञानेश्वर मुंडे यांचेही जबाब घेतले. तसेच फिर्यादीसह संशयित आरोपींचे कॉल डिटेक्टही घेतले. या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून त्यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश तिडके यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील अशोक रणदिवे, तर आरोपींच्या वतीने संपत पवार काम पाहत आहेत. अॅड. पवार यांनी सरकारी पक्षाच्या बारा साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. त्यामध्ये तपास अधिकारी मैथिली झा यांची गुरुवारी सुमारे ४५ मिनिटे साक्ष घेतली. नागपूर येथे प्रशिक्षणासाठी सुमारे ७२ मुली गेल्या होत्या. यांतील काही मुलींचेही जबाब घेण्यात आल्याचे समजते. सरकारी पक्षाच्या वतीने पुरावा पूर्ण झाला असून, १७ जूनला आरोपींचा उलट तपास घेतला जाणार आहे. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालय यावर अंतिम निर्णय देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलीस अधीक्षकांशी चर्चा
न्यायालयात साक्ष झाल्यानंतर मैथिली झा यांनी पोलीस अधीक्षक
डॉ. मनोजकुमार शर्मा यांची पोलीस मुख्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.