सकलजनांशिवाय मराठी भाषा धोरण अपूर्ण
By Admin | Updated: February 25, 2015 00:01 IST2015-02-24T23:59:06+5:302015-02-25T00:01:15+5:30
महावीर जोंधळे : बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व भाषा संचालनालयातर्फे राष्ट्रीय चर्चासत्र

सकलजनांशिवाय मराठी भाषा धोरण अपूर्ण
कोल्हापूर : मराठी भाषा ही आपली मायबोली असून महाराष्ट्राची ती ‘राजभाषा’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मराठी भाषेचे धोरण ठरविताना सकलजनांचा विचार करणे गरजेचे आहे. त्याशिवाय मराठी भाषा धोरण परिपूर्ण होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांनी शनिवारी (दि. २१) शिवाजी विद्यापीठात केले.विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि मराठी विभाग, राज्य शासनाच्या भाषा संचालनालय व मराठी भाषा विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात लेखक जोंधळे यांचे बीजभाषण झाले. ‘महाराष्ट्र राज्याचे पुढील २५ वर्षांचे मराठी भाषा धोरण’ असा चर्चासत्राचा विषय होता. सिनेट हॉलमधील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.लेखक जोंधळे म्हणाले, इंग्रजीच्या माध्यमातून मराठीचे शोषण होत आहे. भाषाप्रदूषणाची लागण सर्वत्र झाली आहे. एखाद्या वस्तूचे नामकरण करताना मराठी प्रमाणीकरणाचा मोठा प्रश्न आहे.कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, मातृभाषा ही महत्त्वाची आहे. तिचा विकास करणे ही प्रत्येक मराठी माणसांची जबाबदारी आहे. मराठी समृद्ध होण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.भाषा संचालनालयाचे विनय मालवणकर यांनी मराठी भाषाविषयक कृती कार्याचा आढावा घेतला. डॉ. नीळकंठ शेरे, महेंद्र कदम, अनिल सपकाळ, सारीपुत्र तुपेरे, विनोद गायकवाड आदींनी विचार मांडले. मराठी विभागप्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांनी प्रास्ताविक केले. सोनम खराडे, आशा रावण, राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)