कोरोनाचा भीती न बाळगता तो रमला रुग्णांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST2021-05-20T04:25:39+5:302021-05-20T04:25:39+5:30
रुकडी माणगाव : तसे घरची परिस्थिती बेताची, सात लोकांचे कुटुंब, घरची जबाबदारी याच्यावर, संसार चालविण्यासाठी कधी कोठे थंडपेय विक्री, ...

कोरोनाचा भीती न बाळगता तो रमला रुग्णांच्या सेवेत
रुकडी माणगाव : तसे घरची परिस्थिती बेताची, सात लोकांचे कुटुंब, घरची जबाबदारी याच्यावर, संसार चालविण्यासाठी कधी कोठे थंडपेय विक्री, तर कधी फळ विक्री, तर कधी खासगी वाहनावर चालक होऊन येणाऱ्या उत्पन्नावर घर चालविण्याची याची धडपड. आता कोरोनामुळे सर्व व्यवसाय बंद.
सध्या सर्व व्यवसाय बंद असताना व घर चालविण्याचे मुश्कील असूनसुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी चोवीस तास सेवा देण्यासाठी धडपडत असलेला माणगाव येथील छोटू चौगुले या युवकाची वेगळी मानवसेवा या परिसरात आदर्शवत ठरत आहे.
सध्या कोरोना म्हणजे धसकी अशी स्थिती असून, या स्थितीत माणगाव येथील छोटू चौगुले हा युवक आपत्कालीन परिस्थितीत कोणीही आजारी पडल्यास कोणत्याही रुग्णालयात त्यांना दाखल करण्यासाठी विनामूल्य सारथी बनत आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास सगेसोयरे पाठ फिरवीत आहेत. या कठीण परिस्थितीत रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी खासगी वाहनधारक तयार होत नाहीत. प्रसंगी भाडेही डब्बल; पण अशा काळात गावात कोणाही आजारी पडला, भले तो कोरोनाबाधित असला तरी त्याला कोणत्याही रुग्णालयात दाखल करायचे असेल तर माणगाव येथील छोटू चौगुले हा युवक आपल्या जिवाची पर्वा न करता विनामूल्य रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यास हजर होत आहे.
चौगुले याने गतसाली कोरोना साथीप्रसंगी गावामध्ये कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांना रुग्णालयामध्ये भरती करण्याचे काम सलग तीन महिने केले, ते पण विनामूल्य व विना सुुुरक्षा. त्याचबरोबर अशा रुग्णांच्या जेवणापासून त्यांना घरी पोहोचविण्यापर्यंत त्यांची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे या काळात त्याचे वडील आजारी असतानासुद्धा वडिलांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून हा गडी थेट गावातील आजारी रुग्णांची सेवा करण्यासाठी सज्ज. आता परत तो रुग्णांची सेवा करण्यासाठी कोरोनाची भीती न बाळगता परत सेवेत रमला आहे.