पुरी न झालेली ‘विच्छा’

By Admin | Updated: November 28, 2015 00:20 IST2015-11-27T23:06:33+5:302015-11-28T00:20:54+5:30

राज्य नाट्य स्पर्धा

'Witch' | पुरी न झालेली ‘विच्छा’

पुरी न झालेली ‘विच्छा’

पुरी न झालेली ‘विच्छा’
अनेक वर्षे नाट्य स्पर्धा आणि थिएटरच्या आवारातील नाट्यविषयक घडामोडींत वावरणारी घोरपडे बंधूंची ‘सुगुण नाट्य कला संस्था’ यापूर्वी वेळोवेळी यश संपादन करून परिचित झालेली आहे. यंदाच्या स्पर्धेत स्क्रीप्ट वाचताच जाता-जाता करता येईल, असे वाटणारे वसंत सबनीस लिखित ‘विच्छा माझी पुरी करा’ हे वगनाट्य सादर केले. वगनाट्य हे जाता-जाता करण्याची गोष्ट नाही; हे जाता-जाता सिद्ध केले. आदमासे तीन-सव्वा तीन तास चाललेला हा खेळ सादरकर्त्यांच्या पायाखाली घोंगडे अडकले असल्यासारखा मुकाटपणे पाहावा लागला.
खरं तर या वगनाट्याचे केवळ वाचन केले अगर वाचून दाखविले तरीही उत्साह संचारतो. रंगभूमी, नाटक आणि नाट्यतंत्रात माहीर असणाऱ्यांनी त्याचा प्रयोग सादर केल्यावर तर आणखी बहार यायला हवी होती; पण का कुणास ठाऊक हा प्रयोग याला पारखा झाला होता. साठच्या दशकात रंगभूमीवर आलेले हे वगनाट्य वसंत सबनीसांच्या सिद्धहस्त लेखणीचा पुरावाच म्हणायचा. गण, गौळण, बतावणी आणि वग या क्रमाने वगनाट्याची घडण होत असते. त्यातला गावरानपणा सादरीकरणाचे संकेत धाब्यावर बसवून त्याचं भदं होतं. संहिता फ्लेक्झिबल आहे
म्हणून त्याचा अतिरेक चालत नाही. या प्रयोगात लेखकाची वाक्ये अजूनही हशा, टाळ्या मिळवितात, याला कारण लेखकाला असलेली सामाजिक, आर्थिक आणि
राजकीय जाण; पण या प्रयोगात केवळ हशा मिळविणे आणि संबंधितांना खूश करण्यासाठी
त्यांचे नामोल्लेख करण्याच्या हव्यासापोटी मूळ संहितेपासून
हे वगनाट्य भरकटत गेले.
लोकसंगीत आणि नृत्य ही वगनाट्याची अतिशय महत्त्वाची बाजू. शाहिरी म्हणजे सुगम
संगीत नव्हे आणि फिल्मी रेकॉर्ड
डान्स म्हणजे दिग्दर्शकाने
मर्यादेच्या पलीकडे घेतलेले स्वातंत्र्यच होते.
‘राजा’, ‘हवालदार’ आणि ‘मैना’ या पात्रांनी हे नाटक वगनाट्याच्या मर्यादेत सुसह्य
करायचा प्रयत्न केला. तांत्रिक
बाजू ठीकठाक. सुगुण संस्थेला यापूर्वी मिळालेल्या यशाकडे पाहता, त्यांनीच का हा प्रयोग केला, असा अनुत्तरित प्रश्न रेंगाळत राहतो. होतं असं कधी-कधी!

राज्य नाट्य स्पर्धा

Web Title: 'Witch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.