हिवाळी दिवसात पावसाळी हवामान
By Admin | Updated: November 22, 2015 00:35 IST2015-11-22T00:21:18+5:302015-11-22T00:35:39+5:30
सूर्यदर्शन नाही : कोल्हापूरकरांची तब्येत बिघडली

हिवाळी दिवसात पावसाळी हवामान
कोल्हापूर : गेले दोन दिवस ढगाळ व दमट हवामानामुळे हिवाळ्यात पावसाळ्याची अनुभूती येत आहे. कोंदट वातावरणामुळे शनिवार निरुत्साही ठरला. सायंकाळी शहराच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाची साथ वाढली आहे.
यंदा प्रत्येक महिन्यात हवामान बदलत आहे. ऐन पावसाळ्यात पाऊस लागला नाही. नोव्हेंबर संपत आला तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. मध्यंतरी थंडीची चाहूल लागली, तोपर्यंत दोन दिवस दमट व ढगाळ हवामान सुरू झाले. बदलणाऱ्या हवामानामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. खराब वातावरणाने घसा, सर्दी, खोकला, तापाची साथ जिल्ह्यात पसरली आहे. अशा दूषित वातावरणाचा केवळ माणसांनाच त्रास होत नाही, तर पिकांनाही फटका बसू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव होत असून वेलवर्गीय पिके धोक्यात आली आहेत. थंडी नसल्याने रब्बी पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून गेले दोन दिवस पावसासारखे वातावरण आहे.
दमट वातावरणात अंगदुखी, डोकेदुखीबरोबर तापाची साथ येते. अशा परिस्थितीत रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरात विश्रांती घेणेच योग्य आहे. केवळ सर्दी, खोकला आहे म्हणून तो अंगावर काढणे धोकादायक ठरू शकते. अंगात ताप राहिला तर रक्तातील पेशी कमी होण्याचा त्रास सुरू होतो. यासाठी रुग्णांनी वेळीच उपचार घ्यावेत.
- डॉ. संजय खाडे