‘मराठा वॉरिअर्स’ची विजयी सलामी
By Admin | Updated: April 8, 2015 00:29 IST2015-04-08T00:00:59+5:302015-04-08T00:29:52+5:30
सतेज पाटील चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा

‘मराठा वॉरिअर्स’ची विजयी सलामी
कोल्हापूर : माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत मराठा वॉरिअर्स संघाने पोलीस बॉईज संघावर ३ विरुद्ध २ गोलफरकाने मात करीत विजयी सलामी दिली. लाईन बझार हॉकी मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे व ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिला सामना मराठा वॉरिअर्स विरुद्ध पोलीस बॉईज संघ यांच्यामध्ये झाला. दोन्ही संघांत समन्वयाच्या अभावामुळे चढाया फोल ठरल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत होता. उत्तरार्धातील सामना अत्यंत वेगवान झाला. यामध्ये दीपक वड्राळेने २७ व्या मिनिटाला व राहू पोटेने ३२ व्या मिनिटाला गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पोलीस बॉईजच्या संतोष पोवारने ३५ व्या मिनिटाला, तर ३७ व्या मिनिटाला आकाश डोंगरेने गोल नोंदवीत सामना २-२ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. शेवटची ७ मिनिटे शिल्लक असताना मराठा वॉरिअर्सच्या प्रमोद पाटीलने गोल नोंदवीत सामन्यात ३-२ अशी आघाडी घेतली. ती सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.
उद्घाटनप्रसंगी करवीरचे उपअधीक्षक अमरसिंह जाधव, उपमहापौर मोहन गोंजारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, परिवहन सभापती अजित पोवार, स्कूल बोर्डाचे चेअरमन संजय मोहिते, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, शिवाजी डुबल, विनायक कारंडे, राहुल देसाई, दादा आगळगावकर, विजय साळोखे, अनिल पारंडेकर, विलास पाटील, रघुनाथ यवलुजे, सागर यवलुजे उपस्थित होते.