‘महावितरण’ची विजयी सलामी
By Admin | Updated: July 9, 2015 00:31 IST2015-07-09T00:31:07+5:302015-07-09T00:31:07+5:30
अखिल भारतीय कबड्डी : महापारेषणचा ७ गुणांनी पराभव

‘महावितरण’ची विजयी सलामी
कोल्हापूर : महावितरण कंपनीने महापारेषण संघाचा ३३ विरुद्ध ७ गुणांनी पराभव करीत अखिल भारतीय वीज क्रीडा नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित व महावितरणतर्फे प्रथमच घेतल्या जाणाऱ्या चाळिसाव्या अखिल भारतीय वीज क्रीडा कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पर्धेचे उद्घाटन ‘महावितरण’चे कार्यकारी संचालक (एचआर) नीलेश गठणे यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले.
मुस्कान लॉन येथे बुधवारी सकाळी स्पर्धेतील पहिला सामना महावितरण विरुद्ध महापारेषण या दोन वीज कंपन्यांमध्ये झाला. सामन्याच्या प्रारंभापासून महावितरणच्या देवेंद्र शिंदे, नीलेश अवचट, किरण देवाडे यांनी उत्कृष्ट चढाई करीत महापारेषण संघाविरोधात दबाव निर्माण केला होता. सामन्याच्या पहिल्या सत्रात महावितरणने २२ गुणांची आघाडी घेतली; तर महापारेषणकडून केवळ चार गुण कमावले होते. दुसऱ्या सत्रात महावितरणने ही आघाडी वाढवीत ३३ गुणांपर्यंत नेली, तर महापारेषण संघाला केवळ तीन गुणांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे हा सलामीचा सामना महावितरणने ३३ विरुद्ध ७ गुणांनी जिंंकत स्पर्धेत आघाडी घेतली.
स्पर्धेचा अन्य निकाल असा :
तमिळनाडू वीज कंपनीने छत्तीसगड वीज कंपनीच्या संघावर ३३ विरुद्ध ११ गुणांनी मात केली. यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेत्या पी. गणेशन याने उत्कृृष्ट चढाई व बचाव करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून देत विजयाला हातभार लावला. तेलंगणाने टाटा पॉवर संघाचा ४३ विरुद्ध २० गुणांनी पराभव केला. चौथ्या सामन्यात पंजाब वीज कंपनीच्या संघाने तेलंगणा वीज कंपनीविरोधात ४० विरुद्ध ४ गुणांची आघाडी घेत एकतर्फी मात केली. दुपारच्या सत्रात बीजीएस दिल्ली वीज कंपनीच्या संघाने आंध्रप्रदेश वीज कंपनी संघाचा ४५ विरुद्ध १० गुणांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात महापारेषण वीज संघाने महाजनको संघाचा ३६ विरुद्ध १२ गुणांनी पराभव केला. उत्तर प्रदेश वीज कंपनीने दिल्ली वीज कंपनीचा ३७ विरुद्ध २५ गुणांनी पराभव केला; तर दिल्ली ट्रॅन्स कंपनीने टाटा पॉवरवर २९ विरुद्ध १६ गुणांनी मात केली. अखेरच्या सामन्यात कर्नाटक वीज कंपनीने उत्तराखंडचा ४३ विरुद्ध ८ गुणांनी पराभव केला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महावितरणचे कार्यकारी संचालक (एचआर) नीलेश गठणे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
अखिल भारतीय वीज क्रीडा नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित चाळिसाव्या अखिल भारतीय वीज क्रीडा कबड्डी स्पर्धेचे बुधवारी सकाळी उद्घाटन करताना महावितरणचे कार्यकारी संचालक (एचआर) नीलेश गठणे. सोबत मुख्य अभियंता शंकर शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यावेळी उपस्थित होते.