‘कर्मवीर’ महाविद्यालय विजेते

By Admin | Updated: November 12, 2014 00:18 IST2014-11-11T23:56:48+5:302014-11-12T00:18:17+5:30

आंतरविभागीय कबड्डी : बिद्रीच्या दूधसाखर महाविद्यालयास उपविजेतेपद

Winners of 'Karmaveer' College | ‘कर्मवीर’ महाविद्यालय विजेते

‘कर्मवीर’ महाविद्यालय विजेते

इस्लामपूर : शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत दबदबा कायम ठेवत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने दूधसाखर महाविद्यालय बिद्रीचा २५ गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतून मेरठ येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ निवडण्यात येणार आहे.
‘कर्मवीर’च्या क्रीडांगणावर या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धा झाल्या. त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील ९ संघांनी सहभाग नोंदवला होता. गटांतर्गत साखळी सामन्यानंतर बाद फेरीचे सामने झाले. इस्लामपूर, बिद्री, वारणानगर व इचलकरंजीच्या संघांनी उपांत्यपूर्व फेरीचे सामने जिंकले. प्रकाशझोतात झालेल्या उपांत्य सामन्यात ‘कर्मवीर’ने नाईट कॉलेज इचलकरंजीचा, तर दूधसाखर बिद्रीने वारणानगरला हरवून अंतिम फेरी गाठली.
आज दुसऱ्या दिवशी सकाळी तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात वारणा संघाने इचलकरंजीचा १४ विरुध्द ५ असा ९ गुणांनी पराभव करीत तृतीय क्रमांक पटकावला. त्यानंतर कर्मवीर इस्लामपूर व दूधसाखर बिद्री यांच्यातील अंतिम सामन्यात ‘कर्मवीर’च्या खेळाडूंनी एकतर्फी वर्चस्व ठेवत बिद्री संघाचा ४५ विरुध्द २0 असा २५ गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले. ‘कर्मवीर’च्या सागर वडार, राहुल वडार, विनायक जाधव, भोगेश भिसे, सुशांत जाधव यांनी नेत्रदीपक खेळ केला, तर बिद्री संघाच्या सुहास वगरे, संदीप जाधव, श्रीकांत जाधव यांनी झुंज दिली.
विजेत्या संघांना दक्षिण कोरियातील आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताकडून खेळताना सुवर्णपदक पटकावणारे याच महाविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. सर्व विजेत्या संघांना ‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चषक देण्यात आले.
यावेळी सभापती खंडेराव जाधव, माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, उद्योजक केदार पाटील, दत्ता पाटील, प्राचार्य डॉ. जे. के. पाटील, निवड समितीचे प्रा. डॉ. बी. एन. उलपे, प्रा. देवेंद्र बिरनाळे, स्पर्धा निरीक्षक प्रा. आयुब कच्छी, राष्ट्रीय प्रशिक्षक पोपट पाटील उपस्थित होते. प्रा. वीरसेन पाटील, अमित माने, नितीन शिंदे, संजय वडार, प्रकाश संकपाळ यांनी स्पर्धेचे संयोजन केले. (वार्ताहर)

Web Title: Winners of 'Karmaveer' College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.