गडहिंग्लज सभेत वादळी चर्चा
By Admin | Updated: January 21, 2015 23:49 IST2015-01-21T21:29:39+5:302015-01-21T23:49:41+5:30
पंचायत समिती सभा : आरोग्य, एस.टी., कृषी धारेवर; गैरहजर पाच विभागांचा निषेध

गडहिंग्लज सभेत वादळी चर्चा
गडहिंग्लज : तब्बल तीन तास चाललेल्या गडहिंग्लज पंचायत समितीच्या मॅरेथॉन मासिक सभेत वादळी चर्चा झाली. आरोग्य, एस.टी., व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले, तर सभेस अनुपस्थितीत राहिलेल्या जीवन प्राधिकरण, पाटबंधारे, महसूल, उपसा जलसिंचन, लघू पाटबंधारे या पाच खात्यांसह उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रमुखांचा निषेध नोंदविण्यात आला.मुंगूरवाडीच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची हलकर्णीत पूर्णवेळ नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी केल्यामुळे मुंगूरवाडीच्या डॉक्टरांची हलकर्णीत बदली करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला. आजूबाजूच्या खेड्यात शोध घेऊन पिसाळलेली कुत्रे ठार मारण्याची सूचना अमर चव्हाण यांनी केलीअनेक वर्षे मागणी करूनही तेरणी-कळविकट्टे बससेवा सुरू होत नसल्यामुळे हलकर्णीत रास्ता रोको करण्याचा इशारा नाईक यांनी दिला. रस्त्याच्या डागडुजीनंतर बसफेरी सुरू करण्याची ग्वाही वाहतूक नियंत्रक मारूती सावंत यांनी दिली. चन्नेकुप्पी व कुंबळहाळ येथे वाहतुकीला अडथळा ठरणारे खडीचे ढीग काढावेत, अशी मागणीही त्यांनी केली.पंचायत समिती कृषी विभागाला काही कामच उरलेले नाही, असा आरोप अमर चव्हाण यांनी केला. कागदी घोडे नाचवू नका, बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, अशी सूचनाही त्यांनी केली. जादा दराने सोयाबीन बियाणे विकणाऱ्या दुकानदारांवर काय कारवाई केली ? या त्यांच्या प्रश्नावर चौकशीचे आश्वासन उपसभापतींनी दिले.
खास समिती नेमून तालुक्यात राबविण्यात आलेल्या नळ योजनांच्या कामांचा आढावा घ्यावा, अशी हेमंत कोलेकर यांनी केलेली सूचना मान्य करण्यात आली. सामानगडावरील इमारती पंचायत समितीकडे वर्ग करण्याचा ठराव झाला. जलयुक्त शिवार योजना, शिष्यवृत्ती परीक्षा यावरही चर्चा झाली. ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला, बी. जी. कुंभार, शहीद जवान सुनिल जोशिलकर, कांता पाटील, सोनाबाई माळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हवा
हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रूग्णांची हेळसांड सुरू आहे. पिसाळलेले कुत्रे चावून जखमी झालेल्या रूग्णांना उपचारांसाठी कोल्हापूरला पाठविले गेले. अनेक वर्षे मागूनही डॉक्टर मिळत नाही. वरिष्ठांनी आदेश देऊनही पर्यायी व्यवस्था होत नसल्याबद्दल बाळेश नाईक यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
‘सभापती’च उशिरा आल्या
दस्तुरखुद्द सभापती अनुसया सुतार या सभा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने सभेला आल्या. तत्पूर्वी उपसभापती तानाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली होती.