कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पाऊस, पहिल्याच पावसात शहर ब्लॉक

By Admin | Updated: June 9, 2016 01:21 IST2016-06-09T00:33:26+5:302016-06-09T01:21:52+5:30

आजरा, जयसिंगपूर, कागल, जोतिबा येथे तासभर हजेरी

Windy rain in Kolhapur district, the first block of city block | कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पाऊस, पहिल्याच पावसात शहर ब्लॉक

कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पाऊस, पहिल्याच पावसात शहर ब्लॉक

जल्ह्यात वादळी पाऊस, पहिल्याच पावसात कोल्हापूर शहर ब्लॉक
आजरा, जयसिंगपूर, कागल, जोतिबा येथे तासभर हजेरी

पावसाळा वेळेत सुरू होतो की नाही, याची शाश्वती नसताना बुधवारी सायंकाळी पावसाने शहरात जोरदार आगमन करीत सर्वत्र पाणीच पाणी केले. महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाई, गटारी पूर्णत: साफ न केल्याने पहिल्याच पावसात नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. या पावसाने शहराच्या सखल भागांत पाणीच पाणी झाले. अनेक घरांत पाणी शिरले. त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक भागांत रस्त्यावर पाणी साचल्याने तसेच वृक्ष कोसळून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्यावर पाणी साचल्यांने यामधून मार्ग काढणेदेखील जिकिरीचे बनले होते.

कोल्हापूर : सायंकाळी चारच्या आसपास सुरु झालेल्या हलक्या पावसाचा जोर पाचनंतर वाढला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन शहराच्या सखल भागात साचून राहण्याचे प्रकार घडले. राजारामपुरी पहिली गल्ली येथील जनता बझार चौक, राजारामपुरी खाऊ गल्ली येथे अचानक झालेल्या पावसामुळे गुडघाभर पाणी साचून राहिले. त्यात काही चारचाकी वाहनेही अडकून पडल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही वाहने यामध्ये अक्षरश: बुडून गेली, तर काही वाहनांना ढकलत पाण्यातून बाहेर काढावे लागले.
दसरा चौक येथील एम्पायर टॉवर येथील पार्किंगमध्ये गुडघाभर पाणी साचून राहिले. त्यामुळे अनेकांच्या दुचाकी पाण्यात अडकून पडल्या. उद्यमनगर येथील स्टेट बँकेसमोरील पेट्रोल पंपामध्ये पाणी साचल्याने या ठिकाणी तर तळेच झाले होते. मिरजकर तिकटी येथील रिक्षा थांब्याजवळ मोठ्या वृक्षाची फांदी पडल्याने काही काळ या परिसरातील वाहतूक खोळंबली. महालक्ष्मीनगर परिसरातील ड्रेनेज चेंबर चुकीचा बांधल्याने दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे परिसरातील घरांत पाणी शिरले. त्यासाठी खोदण्यात आलेल्या चेंबरमध्ये बुधवारच्या पावसामुळे आणखी पाणी साचले. त्यामुळे या परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. बसंत-बहार टॉकीजजवळील सखल भागात पाणीच पाणी झाले होते. यामध्ये अनेक चारचाकी वाहने अडकून पडली होती, तर काही इमारतींच्या बेसमेंटमध्ये किमान चार ते सहा फुटांपर्यंत पाणी साचले होते. बाबूभाई परीख पुलाजवळही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या भागातील वाहतूक तीन तासांहून अधिक काळ थांबली होती. याचबरोबर गोखले कॉलेज परिसर, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, फोर्ड कॉर्नर, शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर, आदी भागांत पाणी साचून राहिले होते. शाहूपुरीतील काही घरांतही पाणी साचल्याने हे पाणी बाहेर काढण्याचे काम नागरिक करीत होते. याशिवाय शहरातील काही भागातील गटारी साफ न केल्याने त्यातील कचरा रस्त्यांवर आला होता.


कोल्हापूर : जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पावसाने बुधवारी हजेरी लावली. या पावसामुळे सुमारे तासभर झोडपून काढले. पावसाचे थेंब मोठ्या प्रमाणात होते.
जोतिबा परिसरात वादळी पाऊस
जोतिबा : जोतिबा डोंगरावर जोरदार मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या पाण्याचे लोंढे जोतिबा दर्शन पायरी मार्गावरून वाहत होते. जोतिबा डोंगरावर दुपारी चारच्या सुमारास आभाळ दाटून आले. पाऊस मोठा येणार यांची चाहूल लागताच सर्वांची धावपळ सुरू झाली. साडेचार वाजता पावसाने सुरुवात केली. पाण्याचे प्रचंड प्रमाणात लोंढे वाहत होते. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची मोठी तारांबळ उडाली. दुचाकी वाहनधारकांना झाडाचा आधार घ्यावा लागला.पावसाचे पाणी गटारीत मावेना. जोतिबा दर्शन पायरी मार्गावरून पाणी वाहू लागले. जोतिबा मंदिराचा उत्तर महादरवाजाचा उंबरा ओलांडून पावसाच्या पाण्याचा लोंढा मंदिर परिसरात शिरला. जोतिबा डोंगर परिसरातील शेतात पाणीच पाणी झाल्याने त्यांना शेततळीचे स्वरूप प्राप्त झाले.
आजऱ्यात दमदार पाऊस
आजरा : आजरा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या या जोरदार सलामीने बळिराजा सुखावला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागासह ठिकठिकाणी बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. भातपीक रोपांसाठी तरवा टाकलेल्या शेतकऱ्यांसह पेरणी करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. पुन्हा-पुन्हा पावसाच्या सरी कोसळत असल्याने तापमान प्रचंड खाली आले असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे. ऊस पिकाच्या दृष्टीनेही हा पाऊस समाधानधारक समजला जातो.
जयसिंगपूरसह परिसरात पाऊस
जयसिंगपूर : जयसिंगपूरसह परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास पावसाने हजेरी लावली़ मान्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे़ बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़ दुपारी दोनच्या सुमारास हलका पाऊस झाला़ त्यानंतर सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली़ शिरोळमध्ये तुरळक पाऊस झाला, तर नृसिंहवाडीसह परिसरात दमदार पाऊस झाला़
म्हाकवे परिसरात दमदार हजेरी
म्हाकवे : कागल तालुक्यातील म्हाकवेसह आणुर, बानगे, बस्तवडे परिसरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तापासून (२५ मे) येथील शेतकऱ्यांनी भाताची धूळवाफ पेरण्या केल्या, तर गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वळीव पावसानंतर सोयाबीन, भुईमूग पिकांच्या पेरण्या काही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी दमदार पावसाची वाट पाहत पेरण्या थांबविल्या होत्या. बुधवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य फुलले. आता सर्वच पिकांच्या पेरणीला गती मिळणार असून, उसाला रासायनिक खतांचा डोस देण्यासही वेग येणार आहे. एकंदरीत दमदार पावसाच्या हजेरीने बळिराजा सुखावला आहे.

Web Title: Windy rain in Kolhapur district, the first block of city block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.