सरस काम करू : महाडिक
By Admin | Updated: September 10, 2014 23:52 IST2014-09-10T23:42:37+5:302014-09-10T23:52:48+5:30
मुरगूडमध्ये नागरी सत्कार : केंद्रातील विविध योजना राबविण्याचा विश्वास

सरस काम करू : महाडिक
मुरगूड : गेल्या पन्नास वर्षांचा अनुशेष तीन महिन्यांमध्ये आपण भरून काढला असून, संसदेमध्ये जिल्ह्यातील विविध समस्या कणखरपणे मांडल्या आहेत. पंचगंगा प्रदूषण, रंकाळा प्रदूषण, जिल्हा पर्यटन, गडकिल्ले सुशोभीकरण, विमानतळ, रेल्वे स्थानक, पासपोर्ट कार्यालय, आदी रेंगाळलेल्या समस्यांना प्राधान्य देऊन सुजलाम् सुफलाम् जिल्हा बनविण्याचा प्रयत्न करणार असून, आतापर्यंत झालेल्या सर्व खासदारांपेक्षा सरस काम करून दाखवू, असा विश्वास धनंजय महाडिक यांनी येथे व्यक्त केला.
मुरगूड (ता. कागल) येथे नगरपरिषदेच्यावतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते. यावेळी लाल आखाडा, सस्पेन्स मित्रमंडळ, मराठा गु्रप, यूथ सर्कल या तरुण मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.
महाडिक म्हणाले, दहा वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीतही मुरगूड शहराने मला मोलाची साथ दिली होती. संपूर्ण देशात मोदींची लाट असताना भल्याभल्या दिग्गजांचा पराभव झाल्यानंतरही कोल्हापूरच्या जनतेने विचार करूनच मते दिल्याने आपला विजय झाला. तीन महिन्यांमध्ये आपण केंद्रीय मंत्र्यांना भेटून कोल्हापूरच्या समस्यांबाबत आपले मत मांडले असून, सभागृहामध्येही आवाज उठविला आहे. सिमेंट दर, कर्जमाफी, महिला अत्याचार, आदींबाबत सखोल अभ्यास करून सभागृहात रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. भविष्यात केंद्राच्या विविध योजना मुरगूडमध्ये आणण्याचे आश्वासन देऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे उभे राहण्याची विनंतीही त्यांनी केली.
प्रवीणसिंह पाटील म्हणाले, महाडिक आणि मुरगूडकर पाटील हे समीकरण अनेक वर्षांपासूनचे आहे. महाडिक जेथे असतील, तेथेच पाटील असतील. महादेवराव महाडिक यांनी वेळोवेळी नगरपालिकेसाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. तीच परंपरा धनंजय महाडिकही सुरू ठेवतील.
उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अजितसिंह पाटील, सखाराम डेलेकर, मुरगूड बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, सुनील चौगले, नामदेव भांदिगरे, राजू आमते, दत्तामामा जाधव, नगरसेवक परेश चौगले, रणजित सूर्यवंशी, विजय मेंडके, आदी उपस्थित होते. शंकर शेणवी यांनी आभार मानले.