‘त्या’ भोंदू बाबावर कठोर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST2020-12-17T04:48:28+5:302020-12-17T04:48:28+5:30

बाळू दळवीच्या सर्व व्यवहारांची तपासणी सुरू नेसरी : करणी काढतो व गुप्त खजिना मिळवून देतो या बहाण्याने नेसरी (ता. ...

‘That’ will take stern action against the false father | ‘त्या’ भोंदू बाबावर कठोर कारवाई करणार

‘त्या’ भोंदू बाबावर कठोर कारवाई करणार

बाळू दळवीच्या सर्व व्यवहारांची तपासणी सुरू

नेसरी : करणी काढतो व गुप्त खजिना मिळवून देतो या बहाण्याने नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील महिलेवर जादूटोणा व अत्याचार करणाऱ्या तथाकथित देवर्षी बाळू दळवी याच्या कारनाम्याचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू असून, त्यामध्ये तथ्य आढळल्यास बाळू दळवी व संबंधित यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले. सिरसंगी (ता. आजरा) येथील संशयित देवर्षी बाळू दळवी याच्यावर जादूटोणा तसेच महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार शनिवारी ( दि. १२) पीडित महिलेने नेसरी पोलिसांत दिली होती.

त्यानुसार पोलीस खात्याने या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. दळवीला १८ डिसेंबरअखेर पोलीस कोठडी मिळाली असून दळवीसह संशयित तीनही आरोपींचा या प्रकरणात कितपत सहभाग आहे, त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बाळू दळवीच्या सर्व व्यवहारांची तपासणी केली जात असून, त्याने यातून किती पैसे गोळा केले, त्याची कोठे-कोठे मालमत्ता आहे, नावावर असलेली वाहने व बँक खात्यावरील उलाढाल तसेच संपत्तीचाही कसून तपास सुरू आहे. दळवीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले जात असून बाळू दळवीच्या जाळ्यात आणखी कोणी-कोणी लोक फसले आहेत का, त्याचाही तपास सुरू आहे.

चौकट..

विश्वस्त मंडळाची तपासणी...

बाळू दळवीच्या विश्वस्त मंडळाबरोबरच मंडळातील सदस्यांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातील संशयित दळवी याने आणखी कोणाला फसवले अथवा महिलांची पिळवणूक झाली असल्यास पोलीस खात्याशी न घाबरता संपर्क साधावा; त्यांची नावे गुप्त ठेवली जातील, असे आवाहन तपास अधिकारी गणेश इंगळे यांनी केले.

Web Title: ‘That’ will take stern action against the false father