रस्त्याकडे माय-बाप सरकार लक्ष देणार का?
By Admin | Updated: November 28, 2014 23:46 IST2014-11-28T23:07:34+5:302014-11-28T23:46:52+5:30
अरळगुंडीकरांची व्यथा : तीन वर्षांपासून दुर्दशा

रस्त्याकडे माय-बाप सरकार लक्ष देणार का?
रवींद्र येसादे - उत्तूर --गेली तीन वर्षे रस्त्याच्या दुर्दशेत अडकलेल्या चिमणे-अरळगुंडी (ता. भुदरगड) रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. माय-बाप सरकार या रस्त्याकडे लक्ष देईल का? अशी विचारणा अरळगुंडी ग्रामस्थ करीत आहेत.
अरळगुंडी-बेडीव-सावतवाडी ही भुदरगड तालुक्यातील गावे आजरा तालुक्यातून या गावांना प्रवेश करावा लागतो. गेली तीन वर्षे रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या मदतीतून रस्त्यावर मुरूम जे.सी.बी. टॅक्टरच्या साह्याने टाकला जातो. पूर्वी केलेला डांबरी रस्ता नामशेष झाला आहे.
मुरूमाच्या साह्याने रस्त्याची डागडुजी करण्यात येत आहे. पण पावसाळ्यात रस्त्यात चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे प्रवास करणे वाहनधारकांना जिकिरीचे बनले आहे.
अरळगुंडी-बेडीव-सावतवाडी या गावांना बाजारहाटसाठी उत्तूर (ता. आजरा) या बाजारपेठेत यावे लागते. त्यामुळे त्यांचा नित्याचा संबंध येतो. या रस्त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे मैल कामगार नसल्यामुळे रस्त्याची देखभाल ग्रामस्थांनाच करावी लागत आहे. चिकोत्रा प्रकल्पामुळे परिसरात उसाचे प्रमाण अधिक आहे. रस्ता चांगला नसल्याने ट्रकचालक ट्रकाची वाहतूक करीत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत व शेतकरी यांनाच चिमणेपासून बेडीवपर्यंत १५ कि. मी. रस्ता करावा लागतो. त्यामुळे माय-बाप सरकारने या रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
रस्त्याची दुर्दशा उडाल्याने या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तालुक्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे लक्ष या ग्रामीण भागातील गावाकडे असावे. वाहतुकीसाठी आणखी किती आर्थिक बोजा ग्रामस्थांनी सोसावयाचा असा प्रश्नही ग्रामस्थांना खुणावतो. त्यामुळे आमदार आबिटकर यांनी या लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.