इतर कर्मचारी बोध घेणार का?

By Admin | Updated: September 1, 2015 23:44 IST2015-09-01T23:44:59+5:302015-09-01T23:44:59+5:30

सिंगतकर लाच प्रकरण : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक थांबणार का ?

Will other employees take the impression? | इतर कर्मचारी बोध घेणार का?

इतर कर्मचारी बोध घेणार का?

दत्ता बीडकर - हातकणंगले  सहकारातील वर्ग-१च्या अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईने सरकारी कार्यालये हादरली आहेत. कार्यालयात वेळेवर पोहोचणार नाहीत, असे सर्व अधिकारी-कर्मचारी दोन दिवस वेळेत कार्यालयात दाखल झाले आणि आपापल्या कामाच्या निपटाऱ्याला लागल्यामुळे एका सिंगतकरांवरील कारवाईने सरकारी बाबू धास्तावले. मात्र, याचा धडा घेऊन पुन्हा वेळ जाताच ‘मागे तसे पुढे’ याप्रमाणे लहान-लहान कामांसाठी सर्वसामान्यांची अडवणूक करणार का, हे येणारा काळच ठरविणार आहे.
हातकणंगले उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयावर शनिवारी सायंकाळी ७.३० वा. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांनी दिवसभर सापळा लावून दहा हजारांच्या लाचेसाठी उपनिबंधक सुनील सिंगतकर, सहायक अधिकारी संजय थैल आणि खासगी चालक राजेंद्र चव्हाण या तिघांना जेरबंद केले. लाचखोरीच्या ट्रॅपसाठी दिवसभर मेहनत करणाऱ्या अधिकाऱ्यांना रात्री ७.३० वा. यश आले.
तालुक्याच्या ठिकाणचे वर्ग-१चे अधिकारी असलेले सुनील सिंगतकर यांच्यावर झालेली वर्ग-१च्या अधिकाऱ्यावरील पहिलीच कारवाई आहे. सिंगतकर यांनी गेली अडीच वर्षे तालुक्याच्या सहकार क्षेत्रात धुमाकूळ घातला होता. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधील सहकारमंत्र्यांपासून जिल्ह्यातील आमदार व माजी आमदारांचे अभय असलेल्या सिंगतकरांनी तालुक्यामध्ये मागे वळून पाहिले नाही. सहकाराची पंढरी असलेल्या हातकणंगले तालुक्यातील प्रत्येक संस्थावर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वत:ची पोळी भाजून घेण्यात सिंंगतकर यशस्वी ठरले होते.
गावपातळीवरील विकास सोसायट्यांपासून राज्यभर नावलौकिक असलेल्या बॅँकांच्या चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीपर्यंत सिंगतकर सभेसाठी हजर राहून थेट तीन ते पाच हजारांची वसुली करीत होते. तालुक्यामध्ये असलेल्या ७२ मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना शासनाने दिलेले भागभांडवल आणि त्यांची वसुली या निमित्ताने सिंगतकर यांनी संस्था चालकांंची मोठी लूट करून स्वत:चे काम फत्ते करून घेतले होते. यंत्रमाग संस्थांनाही शासकीय अनुदान प्राप्त होते. त्याच्या शिफारशीसाठी सिंगतकरांनी दरच ठरविला होता. सिंगतकरांनी इचलकरंजी अर्बन बॅँकेच्या ठेवीधारकांबरोबर कर्जदाराची सेटलमेंट करून परस्पर रकमा हडप केल्या. ‘कर्ज एकाचे, रक्कम दुसऱ्याची आणि फायदा तिसऱ्याचा’, अशी सहकार योजना सिंगतकरांनी अंगीकारली होती. सिंंगतकरांची तालुक्यातील जवळपास वीस संस्थांवर प्रशासक नियुक्ती होती. या संस्थांचा वारेमाप खर्च, वसुलीबाबतची पद्धत आणि संस्था ऊर्जितावस्थेत आणण्यापेक्षा त्या डबघाईला आणण्यासाठी सिंगतकरांचे प्रयत्न मोठे आहेत.
तालुक्यात सिंगतकर यांच्यावरील कारवाईने सरकारी बाबू धास्तावले आहेत. सर्वसामान्य गोरगरिबांच्या कामाच्या निपटाऱ्यासाठी ते सकाळपासूनच कामाला लागले. मात्र, ही वेळ आणि कामाची उरक किती दिवस आत्मसात होणार, हे येणारा काळच ठरविणार आहे.


अनेक तक्रारी
सिंगतकरांच्या मागे-पुढे राजकीय पक्षाचे वलय होते. कॉँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसेचे नेते सिंगतकरांवर होणाऱ्या तक्रारी थोपविण्याचे काम करीत होते. सिंगतकरांवर विभागीय निबंधकापासून सहकार आयुक्तापर्यंत आणि पालकमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक तक्रारी होत्या. मात्र, सिंगतकर आपला हुकमी एक्का वापरून तक्रारदाराला निष्प्रभ करीत होते.

संस्थांवर कारवाई
इचलकरंजी येथील एका नेत्याच्या राजाश्रयामुळे इचलकरंजी शहरामध्ये सिंगतकरांची चलती होती. त्याच्या राजेखुशालीने औद्योगिक व यंत्रमाग संस्थांवर कारवाई होत होती. कारवाईचा बडगा उगारून सेटलमेंट राजमान्य होत असल्यामुळे त्या कार्यकर्त्याचा भाव वधारला होता.

Web Title: Will other employees take the impression?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.