‘केशवराव’ जयंतीचा मुहूर्त साधणार का?
By Admin | Updated: July 9, 2015 00:57 IST2015-07-09T00:57:07+5:302015-07-09T00:57:07+5:30
उद्घाटनाची तारीख अनिश्चित : नाट्यगृह, खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाची लगबग

‘केशवराव’ जयंतीचा मुहूर्त साधणार का?
कोल्हापूर : संगीत नाटकांमध्ये नवा सूर्योदय निर्माण करणारे संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या १२५व्या जयंतीचे आणि नाट्यगृहाच्या शताब्दीचे औचित्य साधून केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचे काम संपविण्याची लगबग सुरू आहे. मात्र महापालिकेकडून उद्घाटनासाठीची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचे काम फेब्रुवारी २०१४ पासून सुरू आहे. ते काम आता संपत आल्याने या दोन्ही वास्तूंचे रूपडे पालटले असून, ते अधिक सुंदर झाले आहे. विशेषत: नाट्यगृहाचा रंगमंच आणि प्रेक्षागृह देखणे झाले आहे. ही पूर्ण वास्तू वूडन कल्चरमध्ये नूतनीकृत करण्यात आली आहे. शिवाय भिंतींवर कोल्हापूरची वैशिष्ट्ये सांगणारी म्युरल्स लावण्यात आली आहेत. प्रकाशयोजना, साउंड सिस्टीम, एसी, रंगमंच ही सगळी कामे आता संपली आहेत. खासबाग मैदानाचेही नूतनीकरण झाले, स्टेजची काही किरकोळ कामे शिल्लक आहेत.
आता नाट्यगृहाचे काम व्यवस्थित झाले आहे की नाही याची तपासणी सुरू करण्यात येणार आहे. नाट्यगृहात नव्याने प्रकाश योजना, साउंड सिस्टीम, एसी अशा यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.
ज्या कलावंताच्या नावे ही वास्तू उभारण्यात आली, त्या संगीतसूर्य केशवराव भोसले यांची १२५ वी जयंती ९ आॅगस्ट रोजी साजरी होत आहे; तर नाट्यगृहाला १५ आॅक्टोबरला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर केशवराव भोसले यांच्या जयंतीचा मुहूर्त साधण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. मात्र जोपर्यंत नाट्यगृहातील खुर्च्यांचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत उद्घाटनासाठीची तारीख ठरविता येणार नाही. गेले दीड वर्ष मेहनत घेतल्यानंतर वास्तू खुली होणार आहे; त्यामुळे केवळ उद्घाटनासाठी घाई न करता परिपूर्ण नाट्यगृह खुले करणे महत्त्वाचे आहे, हेदेखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम झाले असले तरी खुर्च्या येईपर्यंत उद्घाटनाच्या तारखेसंबंधी कोणताही निर्णय घेता येणार नाही. केशवराव भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नाट्यगृह खुले करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता)
नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी सगळ्याच कोल्हापूरकरांनी दीड वर्षे वाट पाहिली आहे. नाट्यगृहाचे उद्घाटन झाले की कार्यक्रमांसाठी, नाटकांसाठी खुले व्हावे अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे इतके दिवस थांबलो आणखी महिना-दीड महिना थांबण्याचीदेखील आमची तयारी आहे. नाट्यगृहातील व्यवस्थांची चाचणी, परवाने अशा सर्व बाबींची पूर्तता होऊन परिपूर्ण नाट्यगृहाचेच उद्घाटन व्हायला हवे. - प्रफुल्ल महाजन (नाट्य वितरक)