इचलकरंजीत आघाडी तुटणार का ?

By Admin | Updated: December 9, 2014 00:55 IST2014-12-08T21:02:18+5:302014-12-09T00:55:49+5:30

तीन वर्षांची आघाडी तुटल्यास पालिकेतील पाणीपुरवठा व बांधकाम हे दोन्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम विभाग राष्ट्रीय कॉँग्रेसकडे राहणार

Will Ichalkaranji's leadership break? | इचलकरंजीत आघाडी तुटणार का ?

इचलकरंजीत आघाडी तुटणार का ?

राजाराम पाटील - इचलकरंजी विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेतील राष्ट्रीय व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील आघाडी संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या तीन वर्षांची आघाडी तुटल्यास पालिकेतील पाणीपुरवठा व बांधकाम हे दोन्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम विभाग राष्ट्रीय कॉँग्रेसकडे राहणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सन २०११ मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँग्रेसचे ३०, राष्ट्रवादीचे १० व श.वि.आ.चे १७ नगरसेवक निवडून आले. ५७ नगरसेवक असलेल्या नगरपालिकेमध्ये कॉँग्रेसला भक्कम बहुमत मिळाल्याने कॉँग्रेसने आपल्या पक्षाचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडले. विविध विषय समित्यांची निवडणूक आली असताना राष्ट्रीय कॉँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. समझोत्याप्रमाणे राष्ट्रवादीला बांधकाम व शिक्षण या दोन समित्या, तर कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा, आरोग्य व महिला बालकल्याण या समित्या राहिल्या.
नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसकडे बहुतांशी नवखे नगरसेवक निवडून आले होते. त्यातील काही नगरसेवक चळवळी आहेत. सत्तारूढ नगरसेवक असूनसुद्धा काही नगरसेवकांनी पालिकेकडील विविध नागरी सेवा-सुविधांसाठी मोर्चे आणले आणि वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली. त्याचा परिणाम म्हणून पालिकेच्या दैनंदिन कामकाजातसुद्धा गोंधळ उडाला. दोन्ही कॉँग्रेसमध्ये समन्वय रहावा आणि नगरसेवकांवर नियंत्रण असावे, यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील माजी आमदार अशोकराव जांभळे यांना पालिकेच्या कारभारात लक्ष पुरविण्यास सांगितले. जांभळे हे पालिकेच्या कामकाजात लक्ष पुरवित असले तरी त्यांच्या एकतर्फी कारभाराबद्दल दोन्हीही कॉँग्रेसमधील नगरसेवकांची नाराजी आहे.
यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ आॅक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये कॉँग्रेसचे उमेदवार अनुक्रमे कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे उभे होते. दोन्हीही निवडणुकांचा निकाल पाहता नगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर केलेल्या आघाडीचा फायदा दिसलाच नाही. उलट यामुळे कारंडे गट दुरावला गेला आणि त्याचा फटका थेट विधानसभा निवडणुकीमध्ये बसला, अशी चर्चा कॉँग्रेसमधील बहुतांशी नगरसेवकांमध्ये आहे.
नगरपालिकेमध्ये विविध प्रकारच्या विकासकामांची चर्चा होत असताना टक्केवारी वाढल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता वाढलेल्या टक्केवारीचा फायदा राष्ट्रवादीला झाला; पण पालिकेत आघाडी असल्याने त्याची बदनामी मात्र कॉँग्रेसला सोसावी लागली, अशी टीका कॉँग्रेसच्या नगरसेवकांतून होत आहे. शहर कॉँग्रेस समितीमध्ये झालेल्या एका बैठकीतसुद्धा काही नगरसेवकांनी याबाबत थेट पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणे मांडले आणि त्यातूनच नगरपालिकेतील राष्ट्रवादीबरोबरची आघाडी संपुष्टात आणावी, असा आग्रह नगरसेवकांनी धरला आहे.
सध्या नगरपालिकेमध्ये कॉँग्रेसचे २९ नगरसेवक असून, काठावरील बहुमत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर आणखीन काही दिवस घरोबा ठेवावा लागेल, असे मत पक्षश्रेष्ठींचे आहे; पण आणखीन दोन वर्षांनी नगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना कॉँग्रेसच्या पदरात बदनामी येऊन जनतेच्या प्रचंड असंतोषाला सामोरे जावे लागेल, अशा विचाराने नगरसेवकांमध्ये मात्र अस्वस्थता आहे.


‘बांधकाम’साठी काही
नगरसेवकांच्या हालचाली
राष्ट्रवादीबरोबर आघाडी तोडल्यास राष्ट्रवादीच्या वाट्यास असलेले बांधकाम व शिक्षण या दोन्ही समित्यांचे सभापतिपद कॉँग्रेसला मिळणार आहे.
त्यातील बांधकाम खाते हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तुटावी, यादृष्टीने काही नगरसेवक हालचाली करीत आहेत. ज्यामुळे कॉँग्रेसमधील आणखीन दोन नगरसेवकांची वर्णी सभापतिपदासाठी लागेल, असेही बोलले जाते.


चोपडेंच्या तक्रारीमुळे विकासकामे ठप्प
प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशा दोन्ही कॉँग्रेसमध्ये उमेदवारांची सरळ लढत झाली.
या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल चोपडे यांना निवडून आणण्यासाठी विरोधी शहर विकास आघाडीने चांगलीच मदत केली.
नगरसेवक चोपडे हे राष्ट्रवादीचे असूनसुद्धा नगरपालिकेच्या अनेक विकासकामांबाबत जिल्हाधिकारी, नगरविकास मंत्रालय, प्रसंगी उच्च न्यायालयातसुद्धा वारंवार तक्रारी करत राहतात.
परिणामी पालिकेतील काही विकासकामे ठप्प झाली आहेत. याबाबतची नाराजीसुद्धा कॉँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये आहे.

Web Title: Will Ichalkaranji's leadership break?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.