गडहिंग्लज : औद्योगिक न्यायालयाच्या निकालानुसार सेवानिवृत्त कामगारांची कारखान्याकडील थकीत ४८ लाख ३९ हजारांची ग्रॅच्युईटी चार दिवसांत देऊ, अशी ग्वाही देतानाच आंदोलन संगनमतानेच सुरू असल्याची टीका आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. थकात ग्रॅच्युईटी व फायनल पेमेंटच्या मागणीसाठी १२ दिवसांच्या बेमुदत धरणे आंदोलनानंतर सेवानिवृत्त कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
शिंदे म्हणाले, ४ मार्च, २०१४ पासून ब्रिस्क कंपनीकडे कारखाना चालवायला देण्यात आला आहे. त्यावेळी झालेल्या करारानुसार कारखान्याला दैनंदिन खर्चासाठी सुरुवातीला दोन वर्षे महिन्याला दीड लाख व त्यानंतर २५ टक्के वाढ याप्रमाणे सुमारे एक कोटी, कारखान्याच्या स्टोअर मालाचे ७२ लाख, कामगारांच्या रिटेन्शनवरील प्रॉव्हिडंड फंडाचे ७५ लाख, ६९ लाखांची बँक देणी मिळून सुमारे पाच कोटी रुपये कंपनीकडून कारखान्याला येणे आहे. यासंदर्भात आपण स्वत: वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. अनेक कारखान्यांप्रमाणे वेतन फरकाचे आम्हीदेखील देणे लागतो, असेही शिंदेंनी सांगितले. संचालक बाळासाहेब मोरे, बाळकृष्ण परीट, माजी संचालक श्रीपती कदम, भीमराव पाटील, बाळासाहेब मोकाशी, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी शशिकांत चोथे, रमेश मगदूम, बापू रेडेकर उपस्थित होते.
दरम्यान, फायनल पेमेंट, ग्रॅच्युईटी व वेतन फरकाच्या मागणीसाठी येथील प्रांत कचेरीसमोर बुधवारी (दि. २७) सेवानिवृत्त कामगारांनी दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू ठेवले होते.
-------------------------------
* आम्हाला निकाल मान्य; पण..!
कारखाना चालवायला देण्यापूर्वीची कामगारांची देणी कारखान्याने आणि त्यानंतरची देणी कंपनीने द्यावी, असा निकाल औद्योगिक न्यायालयाने दिला आहे; परंतु त्याविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. परंतु, न्यायालयाच्या आदेशानुसार कारखाना चालवायला देण्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या ३२ कामगारांच्या ग्रॅच्युईटीचे ४८ लाख ३९ हजार रुपये चार दिवसांत देत आहोत, असेही शिंदेंनी सांगितले.