संकल्पपूर्तीसाठी आवश्यकता इच्छाशक्तीची
By Admin | Updated: January 1, 2015 00:26 IST2015-01-01T00:23:46+5:302015-01-01T00:26:20+5:30
--लोकमत सर्वेक्षण

संकल्पपूर्तीसाठी आवश्यकता इच्छाशक्तीची
इंदुमती गणेश -कोल्हापूर -यंदा मी अभ्यास टॉप करणार, यावर्षी मला अमुक नोकरी लागली पाहिजे, मी कुटुंबीयांना विशेषत: मुलांना वेळ देईन, लवकर उठेन, रोज पहाटे नियमित व्यायाम करीन, असे कितीतरी संकल्प आपण नववषार्निमित्त करतो; पण वर्षाखेरीस हा संकल्प फक्त करण्यापुरताच राहिलेला आहे, हे जाणवते; तर बहुतांश व्यक्तींना संकल्प करण्याची गरज आहे, असे वाटत नाही. संकल्पपूर्ती होण्यामागे इच्छाशक्ती आणि जबाबदारीच्या जाणिवेची आवश्यकता आहे; शिवाय काहीवेळा भोवतालची परिस्थिती तशी असावी लागते. संकल्पपूर्तीसाठी अपेक्षित साथ मिळत नाही, असे प्रांजळ मत वाचकांनी व्यक्त केले.
नववर्षानिमित्त लोकमतने नववर्षाचे संकल्प या विषयावर शंभर वाचकांचे सर्वेक्षण केले. यात त्यांना तुम्ही कोणत्या प्रकारच्या संकल्पांना प्राधान्य देता, संकल्प पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न करता, संकल्प पूर्ण करण्यात कोणते अडथळे येतात, संकल्पपूर्तीसाठी काय उपाय सुचवाल, असे प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे देत ५० जणांनी आम्ही केलेला संकल्प वर्षाखेरीस पूर्ण झालेला नाही, हे मान्य केले. तीस टक्के वाचकांनी संकल्प काही प्रमाणात, तर २० टक्के वाचकांनी ठरल्याप्रमाणे संकल्प पूर्ण झाल्याचे सांगितले.
आयुष्यात किंवा वर्षभरात काय करायचे आहे, हे ठरवून एकदा त्या दिशेने प्रवास सुरू झाला की त्यात सुरुवातीला सातत्य राहते; नंतर मात्र दिवसागणिक हा संकल्प मागे पडत जातो; पण अनेकदा हा मार्गच ठरलेला नसल्याने ‘काय संकल्प करायचा,’ हा प्रश्नही अनेकांना पडला. चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर नवीन वर्षाचाच मुहूर्त धरला पाहिजे असे नाही; त्यामुळे २५ टक्के व्यक्तींनी आम्ही या दिवशी काही संकल्प करीत नाही, असे सांगितले. संकल्प पूर्ण न होण्यामागे इच्छाशक्तीचा आणि जबाबदारीच्या जाणिवेचा अभावही असतो, हे अनेकांनी मान्य केले. संकल्प पूर्ण होताना त्याचा इतरांना त्रास होता कामा नये किंवा कौटुंबिक स्वास्थ्य बिघडायला नको, अशीही अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.
संकल्पपूर्ती केलेल्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे जाणवले. संकल्प जरूर पूर्ण होतात; फक्त त्यासाठी स्वत:वर विश्वास हवा, परिश्रम हवेत, स्वयंशिस्त हवी. वर्तमानाचे भान ठेवून भविष्याचा वेध घेतला तर स्वावलंबी, सुखी, समाधानी व आनंदी जगता येते, हा अनुभवही यानिमित्ताने आल्याचे काहीजणांनी सांगितले.
इतरांकडून चेष्टा
आम्ही काही संकल्प केला आणि तो इतरांना सांगून त्याची अंमलबजावणी सुरू केली की मित्र-मैत्रिणी अगदी कुटुंबीयांकडूनही त्याची काहीवेळा चेष्टा होते, असा अनुभवही काहीजणांनी विशेषत: तरुणांनी व्यक्त केला. सामाजिक संकल्प असेल तर ‘हा काय आम्हाला ज्ञान शिकवतो!...’ असा कुत्सित भाव आणला जातो; त्यामुळेही अनेकदा मानसिक खच्चीकरण होते.
अडथळा मित्रांचा
संकल्प पूर्ण न होण्यामागे मित्रांचा फार मोठा अडथळा असतो, असे मत बऱ्याच महाविद्यालयीन तरुणाईने मांडले आहे. उदाहरणार्थ, एका व्यक्तीने मी दारू सोडण्याचा संकल्प केला. तो अमलातही आणला; पण मित्रांमुळे तो पुन्हा तुटला, असे मत मांडले. याशिवाय आपण ज्या परिसरात राहतो तेथील वातावरणामुळे किंवा तशी कौटुंंबिक स्थिती नसल्यानेदेखील संकल्प पूर्ण करता येत नाहीत, असेही काहीजणांचे म्हणणे आहे.