कारखान्याकडून पहिला हप्ता वेळेत मिळणार का ?
By Admin | Updated: November 11, 2016 23:47 IST2016-11-11T23:47:17+5:302016-11-11T23:47:17+5:30
शेतकऱ्यांमध्ये संभ्रम : एफआरपी अधिक एकशे पंचाहत्तरची अपेक्षा

कारखान्याकडून पहिला हप्ता वेळेत मिळणार का ?
आयुब मुल्ला -- खोची--जिल्ह्यात सध्या साखर कारखाने सुरळीतपणे सुरू झाले आहेत. काही कारखान्यांची यंत्रणा अद्याप म्हणावी तितकी सक्षम झालेली नाही. शेतकरी मात्र ऊस घालविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, पण त्यांच्या मनात खरंच ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार उसाचा पहिला हप्ता मिळणार का? असा संभ्रम आहे. एफआरपी अधिक एकशे पंचाहत्तर असेच मिळणे गरजेचे आहे, पण तसे झाले तरच बरे होईल, अन्यथा गतवर्षीसारखे वेटिंग होणार काय, असेही बोलले जात आहे.
जिल्ह्यात एकूण बावीस साखर कारखाने आहेत. यातील प्रत्येक कारखान्याची एफआरपी वेगळी आहे. त्यामुळे ज्या त्या कारखान्याचा दर वेगळा राहणार आहे. किमान तो उच्चांकी म्हणजे तीन हजार रुपयांच्या आसपास जाईल. परंतु शेतकऱ्यांच्यामध्ये एफआरपीवरून संभ्रम निर्माण होत चालला आहे. खरंच नेमकी एफआरपी किती, ती पंधरा दिवसांत मिळणार का? सोबत असणारी १७५ रुपयांची अधिक होणारी बेरीज यांचा एकत्रित भरणा प्रतिटनाप्रमाणे बँकेत होणार का? असे प्रश्न घोंगावत चालले आहेत.
एकीकडे प्रश्नांचं ओझं डोक्यावर असताना ऊस मात्र घालविणे त्यांना क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे संभ्रमात ऊस घालविण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल ३२०० रुपये मिळाली पाहिजे, अशी मागणी ऊस परिषदेत केली. त्यानंतर तोडग्यासाठी बैठका सुरू झाल्या. इतर संघटनांनी ३५०० रुपये उचलीची मागणी केली. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या तीन बैठकांतून अखेर एफआरपी अधिक १७५ असा पहिल्या उचलीचा निर्णय झाला.
पाच तारखेला बहुतांश कारखाने सुरू झाले. तत्पूर्वी वारणा, डॉ. डी. वाय. पाटील कारखाने सुरूच झाले होते. तोडग्यानंतर प्रत्येक कारखान्याची फॉर्म्युल्यानुसार किती उचल मिळणार याची चर्चा सुरू झाली. त्यानुसार भरून-ओतून हातात किती राहणार खर्चाच्या तुलनेत याचा हिशेब सुरु झाला. पण दराच्या बाबतीत यावेळी फारसे ताणाताणीचे वातावरण झाले नाही. परंतु तोडगा लवकर निघाला हे मात्र महत्त्वाचे वाटले. कारण उसाचे क्षेत्र घटलेले आहे. जिल्ह्यात सुमारे १५५ लाख टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. सांगली जिल्हा याबाबतीत मागे राहील. म्हणजे ५५ लाख टनापर्यंत गाळप होईल.
कारखाना व त्यांची एफआरपी अशी
कारखान्याचे नावदेय एफआरपी
कुंभी-कासारी, कुडित्रे२६०१
भोगावती२५५२
जवाहर, हुपरी२५४९
छ. शाहू, कागल२४९८
शरद, नरंदे२४८५
दत्त, शिरोळ२५३७
डॉ. डी. वाय. पाटील, ग. बावडा२४१४
वारणा साखर कारखाना२३८२
दूधगंगा वेदगंगा, बिद्री२६९९
राजाराम साखर, बावडा२४१०
मंडलिक, हमीदवाडा२५९०
संताजी घोरपडे, हमीदवाडा२४७२
गुरुदत्त, टाकळीवाडी२८३२
पंचगंगा, इचलकरंजी२४२४
आजरा, गवसे२५०९
दालमिया, आसुर्ले पोर्ले२६४६
उदयसिंहराव गायकवाड, सोनवडे२५०१
इको केन शुगर२४७६
हेमरस, चंदगड२६४१
महाडिक शुगर, फराळे२४५०