संजय मंडलिक यांच्या राजकारणाची दिशा ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:36 IST2016-04-09T00:35:54+5:302016-04-09T00:36:45+5:30
पुतळा अनावरणाचे निमित्त : राजकीय नेत्यांची आज मांदियाळी; मंडलिक गटाची ताकद दाखविण्याचा प्रयत्न होणार

संजय मंडलिक यांच्या राजकारणाची दिशा ठरणार
कोल्हापूर : हमीदवाडा (ता. कागल) येथे लोकनेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व प्रेरणा स्थळाचे उद्घाटन आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता कारखाना कार्यस्थळावर होत आहे. या समारंभास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य पक्षाचे मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. प्रा. संजय मंडलिक यांची लोकसभा निवडणुकीची राजकीय दिशा काय राहील यासंबंधीची पायाभरणीही यानिमित्ताने होत आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित केले होते. पवार यांनी तर स्वत:हून या कार्यक्रमास येण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे हा कार्यक्रम सर्वपक्षीय करण्याचा संजय मंडलिक यांचा प्रयत्न होता; परंतु मुख्यमंत्री व पवार यांची वेळ न मिळाल्याने अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. संजय मंडलिक हे सध्या शिवसेनेचे सहसंपर्क नेते असले तरी त्यांना राष्ट्रवादीत घेऊन लोकसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या समारंभास खासदार राजू शेट्टी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे प्रथमच एका व्यासपीठावर येत आहेत. या तिघांतही गेल्या काही दिवसांत परस्परांवर जोरात चिखलफेक सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपच्या महायुतीचा घटक असूनही शेट्टी काँग्रेसवाल्यांपेक्षा जास्त जळजळीत टीका भाजप व पालकमंत्र्यांवर करीत आहेत. तीच स्थिती शिवसेना व भाजप यांच्यातील संबंधाचीही आहे. गुरुवारी झालेल्या मेळाव्यात मुश्रीफ यांनी माजी आमदार संजय घाटगे यांच्यावरही टीका केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा समारंभ होत आहे. त्यामुळे पुतळा अनावरणप्रसंगी राजकारणाचे धुमारेही पेटण्याची शक्यता आहे. या समारंभानिमित्त गटाची ताकद दाखविण्याचाही मंडलिक गटाचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)