वायफळे ग्रामपंचायतीत लिपिक, शिपायाने केला लाखोंचा अपहार
By Admin | Updated: February 23, 2015 23:58 IST2015-02-23T23:30:42+5:302015-02-23T23:58:08+5:30
बीडीओंची माहिती : फौजदारी दाखल, समिती नेमून चौकशी

वायफळे ग्रामपंचायतीत लिपिक, शिपायाने केला लाखोंचा अपहार
सावळज : वायफळे (ता. तासगाव) येथील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिक व शिपाई यांनी २००८ ते २००९ पासून आजपर्यंत बोगस पावत्या व शिक्के तयार करून ग्रामपंचायतीच्या वसुलीचे लाखो रुपये हडप केले आहेत, अशी माहिती तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दाजी दार्इंगडे यांनी दिली.
शिपाई सूरज रामचंद्र सावंत व यापूर्वी लिपिक म्हणून काम करणाऱ्या प्रशांत सिदू सावंत यांनी ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी, जागा व दुकान गाळे भाडे यांची लाखो रुपयांची वसुली करून संबंधित ग्रामस्थांना बोगस व बनावट शिक्के असलेल्या पावत्या देऊन वसुलीचे लाखो रुपये ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात न भरता परस्पर लाटले आहेत. सरपंच साधना झेंडे, उपसरपंच सतीश नलवडे व ग्रामसेवक अनिल पाटील यांनी शिपाई सावंत व लिपिक प्रशांत सावंत यांच्याविरोधात तासगाव पोलिसांत फौजदारी दाखल केली आहे.
ग्रामसेवक म्हणून अनिल पाटील हे गेल्या दोन महिन्यांपासून रुजू झाले आहेत. ग्रामपंचायतीची विविध बिले भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैशाचा तुटवडा असल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वसुलीची मोहीम तीव्र केली. यावेळी काही ग्रामस्थांनी पैसे भरलेल्या पावत्या दाखविल्या. त्या पावत्यांची चौकशी केली असता, त्या बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी बोलून आज ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून घोटाळ्याची माहिती दिली. (वार्ताहर)
४२००८ पासून ते आजपर्यंतच्या ग्रामसेवकांनीही भोंगळ कारभार केल्यामुळे या घटना घडल्या आहेत. सर्वसामान्य लोकांनी जिवाचे रान करुन पैसे ग्रामपंचायतीमध्ये भरले आहेत. अनेकांचे पैसे घेऊनही त्यांना पावत्या दिल्या गेल्या नाहीत. यामुळे त्या नागरिकांना हे कळल्यानंतर तर रडूच कोसळले.
फक्त गावातील १७ दुकान गाळ्यांचे मागील पाच वर्षांत ३ लाख ४0 हजार रुपयांचा अपहार झाला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याशिवाय २००८ पासून ते आजपर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी, जागाभाडे यांच्या वसुलीमध्येही लाखोंचा अपहार झाला आहे. त्यामुळे घोटाळ्याचा आकडा अंदाजे १० लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.