विळ्याने वार करून पत्नीचा खून
By Admin | Updated: October 5, 2014 00:58 IST2014-10-05T00:57:26+5:302014-10-05T00:58:00+5:30
कामेवाडी येथील घटना : दारूच्या व्यसनाने केला घात; संशयित पती फरार

विळ्याने वार करून पत्नीचा खून
कोवाड : कामेवाडी (ता. चंदगड) येथे पत्नीचा विळ्याने वार करून निर्घृण खून करण्याची घटना आज, शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. गंगा शंकर कोळी (वय ३५, सध्या रा. कामेवाडी, मूळ गाव कृष्णा कित्तूर, ता. अथणी, जि. बेळगाव) असे तिचे नाव आहे. खून करणारा पती शंकर कल्लाप्पा कोळी (४०) घटनेनंतर फरार झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शंकर कोळी व गंगा कोळी यांच्या सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो पत्नीसह आपल्या सासुरवाडीत राहात आहे. दोघांना प्रशांत (वय ६) व ऋतुजा (४) अशी मुले आहेत. शंकर याला दारूचे व्यसन असल्यामुळे पती-पत्नीत सतत वाद व्हायचा. तो बेळगावमध्ये एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. मात्र, दारूसाठी नेहमी पत्नीबरोबर वाद करत होता. गेल्या दोन दिवसांपासून दोघांत दारू पिण्यावरून वाद होत होता. आज रात्री आठच्या सुमारास शंकरने गंगाचा झोपेत असताना तिच्या मानेवर विळ्याने वार
करून निर्घृण खून केला. त्याने गंगा मृत झाल्याची खात्री केल्यानंतर मुलगी ॠतुजाला तिच्या शेजारी झोपवून पांघरूण घातले. त्यानंतर त्याने घराला बाहेरून कुलूप लावून पलायन केले.
मृत गंगाचा भाऊ घराकडे आला असता त्याला बाहेरून कुलूप व आत अंधार दिसला. त्यामुळे त्याने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्याला
गंगा रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. त्याने कोवाड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी कोवाड पोलीस दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. संशयित आरोपी शंकर कोळी हा घटनेनंतर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत कोवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)