डोक्यात पाटा घालून पत्नीचा खून
By Admin | Updated: June 15, 2014 01:51 IST2014-06-15T01:15:47+5:302014-06-15T01:51:03+5:30
यादवनगरातील घटना : चारित्र्याच्या संशयावरून कृत्य; पती फरार

डोक्यात पाटा घालून पत्नीचा खून
कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून आज, शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात पतीने दगडी पाटा घालून तिचा निर्घृण खून केला. आरती संजय केंगार (वय २८, रा. यादवनगर, नवीन वसाहत) असे तिचे नाव आहे. संशयित आरोपी पती संजय विश्वास केंगार हा पसार झाला आहे.
पोलिसांनी सांगितले, संजय केंगार चारित्र्याचा संशय घेत पत्नी आरती हिला सतत मारहाण करीत असे. तो सेंट्रिंगचे काम करतो. रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून ते झोपले. पहाटे सहाच्या सुमारास त्याची आई दारात नळाला पाणी भरण्यासाठी गेली. आरती ही दोन मुलांसह पुढल्या सोप्यात झोपली होती. यावेळी संजय याने घरातील स्वयंपाकघरातील दगडी पाटा उचलून तिच्या डोक्यात घातला. घरातून मोठा आवाज व किंकाळी ऐकू आल्याने पाणी भरत असलेली त्याची आई घरात धावत आली. यावेळी संजय गडबडीने निघून गेला. घरात अंथरुणामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आरतीला पाहून तिने आरडाओरडा केला. यामुळे शेजारील लोकांनी घराकडे धाव घेतली. खुनाचे वृत्त कळताच राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरतीच्या मृतदेहाजवळ बसून तिची दोन मुले व सासू आक्रोश करीत होती. पंचनामा करून आरतीचा मृतदेह सीपीआरला विच्छेदनासाठी हलविण्यात आला. याप्रकरणी आरतीची आई सुमन रामचंद्र हत्तीकाटे (रा. जगीवाडा, सातारा) हिने जावई संजय याच्याविरोधात फिर्याद दिली.
आईशी शेवटचे बोलणे
संजय नेहमी चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत होता. हा त्रास असह्य झाल्याने आरतीने आईला हा सगळा प्रकार सांगून आपणास माहेरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार तिची आई काल, शुक्रवारी कोल्हापुरात आली. तिची दुसरी मुलगी शास्त्रीनगर येथे आहे. तिच्याकडे ती रात्री मुक्कामाला राहिली. यावेळी तिने ‘उद्या, शनिवारी तुला घेऊन जाण्यासाठी घरी येते’ असे फोनवरून सांगितले होते. त्यामुळे आरतीने रात्रीच कपड्यांची बॅग भरली होती. यावेळी माहेरी जाण्यावरून पती-पत्नीत वाद झाला होता. दरम्यान, आज तिची आई येण्यापूर्वीच सुडाने पेटलेल्या संजयने तिचा खून केला. (प्रतिनिधी)