रेल्वेने ठोकरल्याने पत्नी ठार, पती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:53 IST2019-05-06T00:53:40+5:302019-05-06T00:53:45+5:30
जयसिंगपूर : रेल्वेमार्ग ओलांडत असताना मोटारसायकलला रेल्वेची धडक बसल्याने दानोळी (ता. शिरोळ) येथील महिला जागीच ठार झाली, तर तिचा ...

रेल्वेने ठोकरल्याने पत्नी ठार, पती गंभीर
जयसिंगपूर : रेल्वेमार्ग ओलांडत असताना मोटारसायकलला रेल्वेची धडक बसल्याने दानोळी (ता. शिरोळ) येथील महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. सविता शीतल पाटील-पाराज (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे, तर शीतल सुरगोंडा पाटील-पाराज (३५) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात पती-पत्नीसोबत असणारी लहान मुलगी बाजूला उभी असल्याने बचावली.
निमशिरगाव येथील भाच्याचे मंगळवारी लग्न असल्याने सविता पाटील, शीतल पाटील व त्यांची लहान मुलगी असे तिघेजण दानोळीहून मोटारसायकलीवरून निघाले होते. निमशिरगाव येथील चवगोंडा मळ्याजवळ रेल्वे फाटक बंद असल्याने फाटकापासून बाजूला असणाऱ्या काही अंतरावरून रेल्वे रूळ ओलांडायचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला सविता व त्यांच्या मुलीने हातातील साहित्य रेल्वेमार्गाच्या पलीकडे नेऊन ठेवले. मुलगी त्याच ठिकाणी उभी होती, तर शीतल हे मोटारसायकल चालवत रेल्वे रूळ ओलांडत होते.
यावेळी पत्नी सविता हिने पाठीमागून मोटारसायकल पकडली होती. या दरम्यान कोल्हापूरहून मिरजकडे पॅसेंजर रेल्वे निघाली होती. काही समजण्याअगोदरच रेल्वेची धडक बसल्याने सविता या रुळाच्या बाजूला फरफटत जाऊन पडल्या व जागीच ठार झाल्या, तर शीतल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी नातेवाइकांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी पाहणी केली. मात्र, रेल्वेच्या हद्दीत अपघात झाला असल्याने रेल्वे पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.