शेतकरी संघावर प्रशासक का नेमू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:31+5:302021-07-07T04:31:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे संचालक मंडळाची गणपूर्ती होत नसल्याने संस्थेचे नियमित कामकाज थांबलेले आहे आणि ...

शेतकरी संघावर प्रशासक का नेमू नये
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे संचालक मंडळाची गणपूर्ती होत नसल्याने संस्थेचे नियमित कामकाज थांबलेले आहे आणि जे आठ संचालक कार्यरत आहेत, त्यांचे पद गणपूर्तीविना अस्तित्वहीन झाल्याने संघावर प्रशासक का नेमू नये, अशी नोटीस जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी मंगळवारी संघाच्या प्रशासनाला बजावली. याबाबत कोणाचे आक्षेप वा सूचना असतील त्यांनी आठ दिवसांत लेखी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.
संघाचे तीन संचालक शिवाजीराव कदम, मानसिंगराव जाधव व विजयादेवी राणे यांनी राजीनामे दिल्याने हा पेच निर्माण झाला असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दप्तर तपासणी करून संचालक अस्तित्वाबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी मंगळवारी अकरा संचालकांना नोटीस बजावली आहे.
स्वीकृतबाबत मंगळवारी सुनावणी
भूविकास बँकेच्या थकबाकीपोटी एम. एम. पाटील, युवराज पाटील व मानसिंग पाटील यांना अपात्र ठरवले होते. त्यावेळी एम. एम. पाटील व मानसिंग पाटील यांच्या ठिकाणी स्वीकृत संचालक घेऊन त्याच्या मान्यतेसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवले होते. मात्र, ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर स्वीकृत संचालक घेण्याबाबत स्पष्टता नसल्याने तत्कालीन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी तो प्रस्ताव नामंजूर केला होता. मात्र, आता तोच मुद्दा घेऊन विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांच्याकडे अपील केली आहे. यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
जी. डी. चौगुले यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी
गूळ विभागाच्या थकबाकी असल्याचा ठपका संघाच्या लेखापरीक्षण अहवालात ठेवला आहे. हाच मुद्दा घेऊन अजितसिंह मोहिते, ॲड. अशोकराव साळोखे, सुरेश देसाई, विजय पोळ यांनी विद्यमान अध्यक्ष जी. डी. पाटील व विजयकुमार चौगुले यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.