बिद्री कारखाना बिनविरोध का नाही ?
By Admin | Updated: July 14, 2017 23:18 IST2017-07-14T23:18:05+5:302017-07-14T23:18:05+5:30
बिद्री कारखाना बिनविरोध का नाही ?

बिद्री कारखाना बिनविरोध का नाही ?
अनिल पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरगुड : कागल तालुक्यातील कागल येथील शाहू कारखाना आणि हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्यांची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वच गटातटांनी सकारात्मक भूमिका घेतली यामुळे जिल्ह्यासह राज्यामध्ये याची चर्चा झाली. आता काही दिवसांत बिद्री साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे, त्याचे पडघम आत्तापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. सभासदांना चांगला दर देणारा आणि कायमची कोणाचीच मक्तेदारी नसणाऱ्या या कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे, असा सूर अनेक सभासदांतून व्यक्त होत आहे.
स्वत:च्या फायद्यासाठी कारखान्याच्या निवडणुकीवर होणारा लाखो रुपयांचा खर्च यामुळे वाचेल पण राजकीय नेते याला फारसे उत्सुक दिसत नाहीत. शाह,ू हमीदवाडा होतो मग बिद्री का नाही, असा प्रश्न सभासद व्यक्त करीत आहेत.
बिद्री, ता. कागल येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखाना कागल राधानगरी भुदरगड व करवीर तालुक्यांतील कार्यक्षेत्र असणारा मोठा कारखाना आहे. या कारखान्याच्या सत्तेमधून तालुक्यातील आणि जिल्ह्यातील राजकारणाची गणिते मांडली जातात; त्यामुळे या ना त्या कारणाने या कारखान्यातील संचालकपद मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. या कारणास्तव निवडणूक दीड, दोन वर्षे लांब असली तरी तिचे पडघम अगोदरच सुरु होतात. सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या कारखान्याची निवडणूक काही दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने आतापासून सभा, मेळावे पार पडत आहेत .
निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासनावर प्रचंड ताण येतो. याशिवाय लाखो रुपये खर्चही कारखान्यावर पडतो, अर्थातच याचा भार या ना त्या कारणातून सभासदांना सहन करावा लागतो, याचा विचार कोणीच करत नाही, बिद्री कारखाना हा हजारो सभासदांच्या मालकीचा आहे. येथे कोणत्याच एका गटाची अथवा घराण्याची मक्तेदारी नाही, त्यामुळे कारखान्याच्या भल्याचा विचार सभासदांनाच करावा लागतो. त्यामुळे सध्या कारखाना सुस्थितीत चालला असताना पुन्हा निवडणुकीचा बोजा टाकून या कारखान्याच्या प्रगतीला खीळ कशाला, त्यामुळे होणारी निवडणूक बिनविरोधच व्हावी, अशी इच्छा अनेक सभासदांची दिसते.
बिनविरोध निवडणुकांची सुरुवात कागल तालुक्यातच झाली आहे. सहकाराचे मंदिर समजल्या जाणाऱ्या ‘शाहू’ च्या निवडणुकीत सर्व गटांनी तसेच प्रमुख नेत्यांनी बिनविरोधचा सूर आळवला; अर्थात एका जागेसाठी ही निवडणूक झाली असली तरी तशी ती बिनविरोधच झाली. काही दिवसांपूर्वी हमीदवाडा येथील मंडलिक कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. एकेकाळी याच कारखान्यात मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यात सत्तेसाठी संघर्ष निर्माण झाला होता; पण हे सगळं विसरून हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक यांनी एकमेकांना पेढा भरवत कारखाना बिनविरोध केला.
१ शाहू कारखान्यावर समरजित घाटगे यांची तर मंडलिक कारखान्यावर संजय मंडलिक यांची एकहाती सत्ता नव्हे, मालकीच आहे. या दोन कारखान्यांसाठी तालुक्यातील सर्व गटातटातील लोकांनी पर्यायाने नेत्यांनी एक पाय मागे घेतला; त्यामुळे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रथम संजय मंडलिक आणि समरजित घाटगे यांनी बिनशर्त पाठिंबा द्यायला पाहिजे, असे अनेक सभासदांचे मत आहे.
२ बिद्री कारखान्याचा कारभार चांगला चाललेला आहे. सध्या कारखाना सुस्थितीत आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणीच विद्यमान उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी जाहीरपणे केली होती. त्यावर मुश्रीफ यांनी सुरुवातीलाच यात अडचणी असल्याचे सांगत याला बगल दिली; तर प्रा. मंडलिक यांनी जुन्या संचालकांना वगळून कारखाना बिनविरोध झाला, तर आपला पाठिंबा अशी अट घातली आहे.
३ एकंदरीतच बिनविरोधाची चर्चा तर सुरु झाली आहे. सर्वसामान्य सभासद बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त करत असताना नेते मंडळी मात्र आपली व्यूहरचना आखण्यात मश्गुल आहेत, पण बिद्री कारखाना ही अनेकांची मातृसंस्था आहे. त्यामुळे कारखाना टिकला पाहिजे, या उदात्त हेतूने नेत्यांनी एकत्र बसून शाहू , हमीदवाडाप्रमाणे बिद्रीची निवडणूक बिनविरोध पार पाडावी, असे मत जाणकार सभासद व्यक्त करत आहेत.