ठेका कुणाचा, शिपेकर कोण?
By Admin | Updated: December 2, 2014 00:46 IST2014-12-02T00:39:24+5:302014-12-02T00:46:46+5:30
सीपीआर कर्मचारी मारहाण प्रकरण : कार्यकर्त्यांनी अधिष्ठात्यांना धरले धारेवर

ठेका कुणाचा, शिपेकर कोण?
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) कंत्राटी कामाचा ठेका घेतलेल्या सागर शिपेकरप्रकरणी आज, सोमवारी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठूळे यांना कर्मचारी मारहाणप्रकरणी जाब विचारला.
तीन दिवसांपूर्वी हृदयशस्त्रक्रिया विभागामध्ये काम करणारे शिपाई दत्तात्रय कांबळे यांना शिपेकर याने मारहाण केल्याचा प्रकार सीपीआर आवारात घडला होता. याप्रश्नी आज भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. कोठूळे यांची भेट घेऊन ‘शिपेकर हा ठेकेदार नव्हे, ठेका कुणाच्या नावावर आहे, शिपेकर हा कोण आहे? ’अशा प्रश्नांची सरबत्ती केली. संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केली.
सागर शिपेकर याने २८ नोव्हेंबरला कांबळे यांना किरकोळ कारणावरून मारहाण केली. शिपेकरवर कारवाई न करता त्याला प्रशासन पाठीशी घालत आहे, असा आरोप सखाराम कामत यांनी केला. यापूर्वीही शिपेकरने डॉक्टरांना दमदाटी व शिवीगाळ केली आहे. या परिसरात काम करणारे सर्वच अधिकारी, कामगार, कर्मचारी दहशतीखाली वावरतात. कंत्राटी पद्धतीने कामगारांना पुरविण्याचा ठेका कुणाच्या नावावर आहे, या कामगारांना दिलेले जाणारे वेतन किमान वेतनाप्रमाणे नाही. संबंधिताला अनेकवेळा मुदतवाढ दिलेली आहे. त्याचे कार्यालय कोणत्या अटींवर दिले आहे. त्याचे भाडे वसूल केले जाते का? शासकीय नियमांनुसार ठेकेदारावर नियंत्रण ठेवणारी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे ठेका बंद करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून पोलीस ठाण्यामध्ये ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोठूळे यांच्याकडे शिष्टमंडळाने केली. तत्पूर्वी, सीपीआरमधील अधिष्ठाता कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली.
शिष्टमंडळात बाळासाहेब बेलेकर, वर्षा कांबळे, भाऊसाहेब काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब कांबळे, शिवाजी खामकर, सुरेश भोसगोल, विजय कांबळे, राजू वसरगे, बंकट थोडगे, भीमराव जैताळकर, आदींचा सहभाग होता.
कर्मचारी मारहाणप्रकरणी समिती नेमण्यात आली आहे. समितीला या प्रकरणाचा अहवाल लवकर देण्याचे सांगितले आहे.
- डॉ. दशरथ कोठूळे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,कोल्हापूर.