बँकेसाठी मुश्रीफांनी कोणाचे पाय धरले

By Admin | Updated: May 13, 2015 00:48 IST2015-05-13T00:16:50+5:302015-05-13T00:48:00+5:30

राजू शेट्टींचा पलटवार : शेतकऱ्यांनी सांगितल्यास मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानांच्या दारात आंदोलन

Whom did the Muthrif foot hold for the bank? | बँकेसाठी मुश्रीफांनी कोणाचे पाय धरले

बँकेसाठी मुश्रीफांनी कोणाचे पाय धरले

कोल्हापूर : माझे हात दगडाखाली सापडलेले नसल्याने शेतकऱ्यांनी आदेश दिल्यास मुख्यमंत्र्यांच्याच काय पंतप्रधानांच्या घरापुढे जाऊन आंदोलन करू. जिल्हा बँकेतील घोटाळ्याची चौकशी लपविण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी कोणाचे पाय धरले, ‘गोकुळ’च्या निवडणुकीत कुणाचा गेम केलात, तुमची पापे लपणार नाहीत, असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला.
महामंडळाच्या तुकड्यासाठी राजू शेट्टींनी ‘वर्षा’वर लोटांगण घातल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली होती. याबाबत त्याच भाषेत खासदार शेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकातून मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला.
पत्रकात म्हटले की, शरद पवार यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठराविक साखर कंपन्यांचे लाड करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम पवार यांनी केल्याने मुश्रीफ यांनी पवार यांची वकिली करू नये. मी माझा स्वाभिमान कधीही गहाण टाकलेला नाही आणि टाकणारही नाही. आंदोलन कधी व कुठे करायचे हे आम्ही ठरवतो. जिल्हा बँकेतील ५ कोटी ३४ लाखांची जबाबदारीची रक्कम मुश्रीफ यांनी अगोदर भरावी, मगच बोलावे. राष्ट्रवादीचे महापौर लाचप्रकरणात अडकले आहेत, त्याच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांचे उंबरे झिजवणाऱ्यांनी बोलू नये. महापौर बदलून मोक्याच्या जागेचा ठराव करून जागा हडप करण्याचा डाव कोणाचा आहे. राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांची चौकशी होऊ नये, म्हणून भाजपशी हातमिळवणीचे काम ही मंडळी करीत आहेत. माझ्या मिशीला कधीही खरकटे लागलेले नाही म्हणून आवाज खणखणीत आहे. हिंमत असेल तर सरकारविरोधात खणखणीत बोलून दाखवा. भाजपची सत्ता आल्यानंतर न मागता पाठिंबा का दिला, शरद पवार व पंतप्रधान मोदी यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विरोधात बोलतो म्हणून महायुतीतून काढून टाकले तरी बेहत्तर, आम्ही सत्तेसाठी, मंत्रिपदासाठी जन्मलो नाही. आमच्या मनगटात ताकद आहे, म्हणूनच विरोधात बोलतो, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.


शेट्टी म्हणाले,
माझे हात दगडाखाली सापडलेले नाहीत
‘गोकुळ’च्या निवडणुकीत कुणाचा गेम केलात, तुमची पापे लपणार नाहीत
हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जावेच लागणार आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नव्हे, तर जिल्हा बँक बुडविल्याबद्दल. बँकेत सत्ता असताना अडचणीतील संस्थांचा लिलाव कसा काढला, त्या कुणी विकत घेतल्या. कागल शाखेतील गायब झालेल्या रकमेबाबत मुश्रीफ यांची नार्को टेस्ट केली तर सत्य बाहेर येईल. बँकेतील घोटाळा व कारवाई टाळण्यासाठी कुणाचे पाय धरले, हे शेतकऱ्यांना माहिती असल्याचे शेट्टी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Whom did the Muthrif foot hold for the bank?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.