उपचाराचा खर्च कोण भागविणार
By Admin | Updated: February 26, 2015 00:46 IST2015-02-26T00:41:52+5:302015-02-26T00:46:52+5:30
सरकारची भूमिका संदिग्ध : कुटुंबीयांच्या मदतीसाठी लोक स्वत:हून पुढे

उपचाराचा खर्च कोण भागविणार
विश्वास पाटील - कोल्हापूर --ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर येथील अॅस्टर आधार रुग्णालयात झालेल्या उपचाराचा खर्च कोण भागविणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. राज्य शासनाने एअर अॅम्बुलन्ससह मुंबईतील खर्चाची जबाबदारी घेतली आहे परंतु येथील खर्चाबाबत सरकारने काहीच स्पष्ट केलेले नाही. सरकार काही करू दे अथवा नाही, काही झाले तरी उपचाराच्या खर्चातील एक रुपयाही पानसरे कुटुंबीयांना भरायला लागू नये यासाठी स्वत:हूनच लोक पुढे येत आहेत.पानसरे दाम्पत्यावर १६ फेब्रुवारीस दारातच गोळीबार झाल्यावर त्यांना तातडीने अॅस्टर आधारमध्ये दाखल करण्यात आले. गोविंद पानसरे यांच्यावर तीन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यांना २० फेब्रुवारीस मुंबईला ब्रीच कँडी रुग्णालयात हलविले. त्या दिवशी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. उमा पानसरे यांच्यावर मात्र अजूनही अॅस्टर आधारमध्येच उपचार सुरू असून आणखी किमान पंधरा दिवस त्यांना रुग्णालयात ठेवावे लागण्याची शक्यता आहे. पानसरे यांच्यावरील उपचाराचा ४ लाख ६० हजार खर्च झाला आहे. उमाताई यांच्यावरील उपचाराचा खर्च दोन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे एकत्रित सहा लाखांवर खर्च अपेक्षित आहे. पानसरे यांच्यावरील उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते परंतु तो मुंबईतील की कोल्हापुरातील हे स्पष्ट झालेले नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या खूनप्रकरणी राज्यातील भाजप सरकारवर व मुख्यमंत्र्यांवरही कम्युनिस्ट पक्षासह सर्वच डाव्या पुरोगामी पक्षांकडून व नेत्यांकडून टीका झाली आहे. त्यामुळे सरकारची मदत घेण्याबाबतही संदिग्धताच आहे.मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी पानसरे यांना बघायला गेल्यावरच स्वत:हून एक लाखाचा धनादेश दिला आहे. आणखी काही मदत लागल्यास कळवा, धनादेश पाठवून देतो, असे त्यांनी सांगितले आहे. पानसरे यांच्याशी अत्यंत जिव्हाळ््याची मैत्री असलेल्या पाच-सहा वकील मित्रांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ के. ए. कापसे यांनी खर्चाची सर्व जबाबदारी आम्ही घेतो, असे सांगितले आहे. त्याशिवाय पानसरे यांच्याशी गेल्या पंचवीसहून अधिक वर्षाचा स्नेह असलेल्या ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अभय नेवगी यांनीही रुग्णालयाचे बिल किती झाले तेवढे सांगा, त्याचा धनादेश पाठवून देतो, असे सांगितले आहे.
माणुसकीचा ‘आधार’
अॅस्टर आधार रुग्णालयातील डॉक्टरांशी पानसरे यांचे अगोदरपासूनच ऋणानुबंध होते. पानसरे कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे बिलाबाबत प्राथमिक चौकशी केली. तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका, उमातार्इंवर चांगले उपचार होऊन त्या घरी जाऊ देत मग बिलाचे काय करायचे ते ठरवू, असे रुग्णालयाने त्यांना सांगितले आहे. त्यामुळे रुग्णालयही माणुसकीचा काही तरी ‘आधार’ देण्याच्या विचारात आहे.
सरकारचा रुपयाही नको...
पानसरेंवर हल्ला झाल्याप्रकरणी राज्य सरकारची भूमिका वादग्रस्त राहिली आहे. हा हल्ला हिंदुत्ववादी संघटनांकडून झाल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. राज्यात भाजपचे सरकार असून, त्यांचे हिंदुत्ववाद्यांना पाठबळ असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पानसरे यांच्यावरील उपचारांचे बिल भागविण्यासाठी सरकारकडून एक रुपयाही घ्यायचा नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
पानसरे कुटुंबीय आज ‘आयजीं’ना भेटणार
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाबाबत गेल्या नऊ दिवसांत पोलिसांना कोणतीही माहिती हाती लागलेली नाहीच; शिवाय पोलीसच हल्ल्याच्या कारणांबाबत लोकांत संभ्रम निर्माण होईल, अशी माहिती माध्यमांना देत असल्याबाबत पानसरे कुटुंबीय आज, गुरुवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांची भेट घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता ही भेट होणार आहे. गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी उदय नारकर होते. पुढील कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी ही बैठक झाली झाली. त्यास दिलीप पोवार, नामदेव गावडे, मिलिंद यादव, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, आदी उपस्थित होते.
गोविंद पानसरे
भ्याड हत्या प्रकरण