राजेंच्या नादी कोण लागणार
By Admin | Updated: May 10, 2015 00:43 IST2015-05-10T00:39:04+5:302015-05-10T00:43:18+5:30
शरद पवार : सर्व स्थानिक राजकीय निर्णय साताऱ्यातूनच व्हावेत

राजेंच्या नादी कोण लागणार
सातारा : ‘पहिल्यापासूनच बारामतीपेक्षा साताऱ्याला महत्त्व आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांची ही भूमी आहे. याच ठिकाणाहून सर्व राजकीय निर्णय व्हावेत, अशी माझीही इच्छा आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच वाक्यात राजकीय स्थितीवर भाष्य केले.
रामराजे व उदयनराजे यांच्यातील वादाबाबत विचारले असता, ‘दोन राजेंमध्ये काय असते, हे तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे राजेंच्या नादी कोण लागणार?’ अशी मिश्किलीही त्यांनी यावेळी जोडली.
‘सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीवर पुन्हा विश्वास ठेवला आहे, या विश्वासास पात्र ठरण्यासाठी त्यांनी आता प्रयत्न केले पाहिजेत,’ असेही शरद पवार यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘पवार भाजपच्या जवळ जात आहेत,’ असा आरोप केला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले, ‘अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक काँगे्रसने भाजप व शिवसेनेला सोबत घेऊन लढविली.
महाराष्ट्रात कटुता वाढू नये, यासाठी मी काही बोलत नाही. राज्य एकसंध राहावं ही माझी इच्छा आहे. राष्ट्रीय प्रश्नांच्या बाबतीत सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याचे लोण आता सधन अशा पश्चिम महाराष्ट्रातही पसरले आहे. सरकारने योग्यवेळी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना या संकटसमयी दिलासा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रापासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीबाबत शरद पवार म्हणाले, ‘अनेकांनी हौतात्म्य पत्करल्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आहे. राज्य एकसंध राहिले पाहिजे. ज्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली, त्या नेत्यांना तेथील जनतेनंच स्वीकारलं नाही. वेगळ्या विदर्भाबाबत येथील जनतेचा कौल महत्त्वाचा आहे. येथील जनताच वेगळ्या विदर्भाच्या निर्णयाबाबत अनुकूल नाही.’
जमीन अधिनियम कायद्याला आपला विरोध असल्याचे स्पष्टीकरण पवारांनी केले. शेतीच्या तुकड्यावरच शेतकरी तग धरून राहतो. आता परस्पर या जमिनी काढून घेतल्या गेल्या, तर तो देशोधडीला लागेल. त्यामुळे केंद्र शासनाच्या भूमी अधिग्रहण कायद्याला आमचा विरोध आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले तरी ते राज्यसभेत मंजूर होणारच नाही. (प्रतिनिधी)
अशोक चव्हाण म्हणजे लहान मूल !
पवार भाजपच्या जवळ गेले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला होता. याबाबत पवार यांनी ‘लहान मुलं असं बोलतात. महाराष्ट्रातील कटुता वाढू नये, यासाठी मी त्याला प्रत्युत्तर दिलं नाही,’ असं स्पष्टीकरण केले.