धुमश्चक्रीस जबाबदार कोण?

By Admin | Updated: August 24, 2015 00:36 IST2015-08-24T00:29:04+5:302015-08-24T00:36:30+5:30

शिक्षक बँक : पळपुटेपणामुळेच घटना - प्रसाद पाटील; सभासदांनी नाकारलेल्यांकडूनच कृत्य : राजमोहन पाटील

Who is responsible for Dhumashchris? | धुमश्चक्रीस जबाबदार कोण?

धुमश्चक्रीस जबाबदार कोण?

 कोल्हापूर : शिक्षक बॅँकेच्या सभेत रविवारी सत्तारूढ व विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. या राड्यास जबाबदार कोण? याबाबत दोन्ही गटांच्या नेत्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी एकमेकांकडे बोट करून निषेध नोंदवला.
पळपुटेपणामुळेच राडा : पाटील
शिक्षकांची अस्मिता असणाऱ्या प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या सभेतील राड्यास सत्तारूढ गटाचा पळपुटेपणाच जबाबदार असल्याची घणाघाती टीका पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष व बॅँकेचे संचालक प्रसाद पाटील यांनी यावेळी केली. आम्ही रितसर लेखी प्रश्न विचारले होते. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून खोटा ताळेबंद प्रसिद्ध करून सहकार खात्याबरोबर सभासदांची दिशाभूल केली आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या नियमानुसार देणे व्याजाची सर्व तरतूद १०० टक्के केल्याशिवाय ताळेबंद अंतिम करता येत नाही. मुदत ठेवीवर कोट्यवधीचे येणे व्याज तरतूद न करता बॅँक नफ्यात चालविल्याच्या गप्पा मारत आहेत. याबाबत आम्ही रिझर्व्ह बॅँकेकडे तक्रार केली आहे. याबाबत रविवारच्या सभेत आम्ही जाब विचारणार होतो; पण विषयपत्रिकेवरील एकाही विषयावर चर्चा न करता वंदे मातरम् घेऊन सभा संपविल्यानंतर सभासद आक्रमक झाले. सभा संपल्यानंतर वास्तविक त्यांनी बाहेर जाणे अपेक्षित होते. आम्ही लोकशाही मार्गाने समांतर सभा घेणार होतो; पण तिथेही गावगुंडांच्या माध्यमातून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. रविवारच्या सभेत झालेल्या मारहाणीसह सर्वच गैरकृत्यांचा आम्ही निषेध करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सभासदांनी नाकारलेल्या मंडळींकडूनच राडा : राजमोहन पाटील
बॅँकेच्या निवडणुकीत सभासदांनी नाकारलेल्या दलबदलू मंडळींमुळेच सभेत राडा झाल्याचा पलटवार बॅँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील यांनी केला. सभेला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली होती. प्रास्ताविकातच लेखी प्रश्नांसह आयत्यावेळी येणाऱ्या प्रश्नांवर समर्पक उत्तर दिल्याशिवाय सभागृह सोडणार नाही, अशी ग्वाही दिली होती. गेली सहा वर्षे बॅँकेला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढून नफ्यात आणली. गेले चार-पाच महिने विरोधकांना विश्वासात घेऊन बॅँकेचा कारभार सुरू असताना केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही. आपण शिक्षक आहोत, याचे भान अनेक मंडळींना नाही. ज्यांना सभासदांनी नाकारले, अशा मंडळींनी सामान्य सभासदाला मारहाण केली. अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. आम्ही सभा चालविण्यासाठी बांधील होतो; पण जाणीवपूर्वक गोंधळ करून शिक्षक पेशाला गालबोट लावण्याचा उद्योग विरोधकांनी केला आहे. बॅँकेच्या नफ्याबाबत बोलणाऱ्यांनी मुळात ताळेबंद म्हणजे काय हे समजून घ्यावे. लेखापरीक्षकांनी आमचा कारभार पाहून ‘अ’ वर्ग दिला, ही गेल्या सहा वर्षांतील कामाची पोहोचपावती आहे. दुर्दैवाने विरोधकांना चांगल्याला चांगले म्हणण्याची सवय नसल्याने गोंधळ करून सभासदांना वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप अध्यक्ष पाटील यांनी केला.
विरोधकांनीच सभा
उधळली : राजाराम वरुटे
सभासदांच्या लेखी प्रश्नांसह आयत्या वेळी येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी अध्यक्ष राजमोहन पाटील यांनी केली होती. सभा अतिशय शांतपणे चालविली जाईल, यासाठी आमचे प्रयत्न होते; पण दुर्दैवाने विरोधकांना सभा उधळायची होती. माझ्यावर गुंड आणल्याचा आरोप करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे. स्वत:च गुंडांसारखे कृत्य करून सभासदांना मारहाण करण्याचे काम विरोधकांनी केले आहे. ज्यांना बॅँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलमध्ये संधी दिली नाही, ती मंडळी बिनबुडाचे आरोप करून शिक्षकी पेशाला बदनाम करण्याचा उद्योग करत आहेत, असे राजाराम वरूटे म्हणाले
महिला सभासदांची तारांबळ
शिक्षक बॅँकेची सभा म्हटले की ताटे फेकाफेकी, हाणामारी असेच समीकरण असल्याने महिला सभासद सभेकडे पाठ फिरवत होत्या. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांपासून बँकेची सभा शांततेत पार पडत असल्याने गेल्या दोन सभांपासून महिला सभासद येत होत्या. यावेळी मात्र हाणामारीमुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाळी. गोंधळ उडाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरत वाट मिळेल तेथून सभागृहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
अध्यक्षांना बदनाम करण्यासाठीच वरुटेंची खेळी
बॅँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील यांना सभा हाताळता येत नाही, हा ठपका ठेवण्यासाठीच राजाराम वरुटे यांनी करवीर तालुक्यातील समर्थक आणून गोंधळ घातल्याचा आरोप शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष (थोरात गट) रवी पाटील यांनी केला.

Web Title: Who is responsible for Dhumashchris?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.