कुणी जागा देता का जागा?-लोकमत विशेष
By Admin | Updated: August 24, 2014 22:35 IST2014-08-24T22:00:36+5:302014-08-24T22:35:38+5:30
पदे मंजूर : सांगली, मिरजेतील दोन पोलीस ठाण्यांचा प्रश्न रखडला

कुणी जागा देता का जागा?-लोकमत विशेष
सचिन लाड - सांगली --जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेले सांगलीतील संजयनगर व मिरजेतील गांधी चौकी पोलीस ठाणे उभे करण्यासाठी जागा मिळत नसल्याने स्वतंत्र पोलीस ठाण्यांचा प्रश्न रखडला आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे मंजूर झाली. ही पदे दोन महिन्यांपूर्वी भरण्यात आली आहेत. आता प्रश्न आहे तो केवळ जागेचा. यासाठी ‘कुणी जागा देता का जागा.’ अशी हाक देत पोलिसांकडून जागेचा शोध सुरू आहे.
जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. विशेषत: विश्रामबाग, मिरज शहर व पलूस या तीन पोलीस ठाण्यांची हद्द फार मोठी आहे. विश्रामबाग ठाण्याची हद्द माधवनगर, शंभरफुटी रस्ता, मिरज रस्त्यावरील विजयनगर, यशवंतनगर, अहिल्यानगर, कुपवाड रस्त्यावरील बालाजीनगर या ठिकाणापर्यंत येते. मिरज ठाण्याची परिस्थितीही अशीच आहे. पलूस ठाण्याच्या हद्दीतील गावे २० ते २५ किलोमीटर अंतरावर आहेत. एखादी घटना घडल्यानंतर तिथे जाण्यासाठी पोलिसांना अर्धा तास लागतो. गेल्या काही वर्षात गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. मात्र ठाण्यातील कर्मचाऱ्यांत वाढ झालेली नाही. विश्रामबाग हद्दीत संजयनगर हा अत्यंत मोठा परिसर येतो. तेथे सध्या पोलीस चौकी आहे. मिरजेतही गांधी चौकी आहे. भिलवडी येथे औटपोस्ट आहे. या तीनही ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणी उभी करण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता.
नव्या ठाण्यांची हद्द ठरविली जाणार!-
सध्या जिल्ह्यात २२ ठाणी आहेत. ती आता २५ होणार आहेत. नव्याने मंजूर झालेल्या ठाण्यांची हद्द ठरविली जाणार आहे. तिन्ही ठाण्यांसाठी सव्वादोनशे पदे भरण्यात आली आहेत. प्रत्येक ठाण्यात साधारणपणे सत्तर कर्मचाऱ्यांचा स्टाफ असणार आहे. संजयनगर व गांधी चौकीत निरीक्षक, तर भिलवडी ठाण्यात सहाय्यक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्ह्यात अधिकारी व कर्मचारी मिळून दोन हजार तीनशे पोलीस दलाचे बळ आहे. तरीही जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे.
भिलवडी पोलीस ठाण्याचा प्रश्न सुटला आहे. संजयनगर पोलीस ठाण्यास जागा देण्यासाठी महापालिकेने सकारात्मक भूमिका घेतली आहे. यामुळे त्याही जागेचा लवकरच प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा आहे. मिरजेतील गांधी चौकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन ठाण्यांची कार्यपद्धती व त्यांची हद्द ठरविली जाईल.
- दिलीप सावंत,
जिल्हा पोलीसप्रमुख